भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली आहे. विश्वचषक जिंकताच भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला रामराम केले. आता जड्डूने त्याच्या आईच्या आठवणीत एक भावुक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये विश्वचषकाची ट्रॉफी घेतलेल्या अवस्थेत जडेजाही दिसत आहे. जडेजाने आपल्या आईसोबतचे स्केच शेअर करणे देखील खास आहे कारण काही दिवसांपूर्वी तो कुटुंबातील कलहामुळे चर्चेत आला होता. काही महिन्यांपूर्वी जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह यांनी त्यांची आमदार सून रिवाबा हिच्यावर कुटुंब उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला होता.
२००५ मध्ये रवींद्र जडेजा अंडर-१९ संघाचा हिस्सा होता. तेव्हा त्याच्या आईने या जगाचा निरोप घेतला. आईच्या आठवणीत जड्डूने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट केली. त्याने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले की, मी मैदानात जे काही करत आहे, ती एक तुझ्यासाठी श्रद्धांजली आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी रवींद्र जडेजाच्या वडिलांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना जड्डूवर गंभीर आरोप केले होते. माझा मुलगा आता माझ्याकडे दुर्लक्ष करतो, त्याला क्रिकेटर बनवून मोठी चूक झाली असल्याचे त्यांनी सांगितले होते. एवढेच काय तर जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा आणि जड्डूची बहीण विधानसभा निवडणुकीत आमनेसामने होत्या. पण, रिवाबाने भाजपच्या तिकीटावर मोठ्या मतांनी विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे रवींद्रची पत्नी रिवाबाने त्याला आमच्यापासून दूर केले असल्याचा आरोप जड्डूच्या वडिलांनी केला होता.
जड्डूची विश्वचषकातील कामगिरी रवींद्र जडेजाने वर्ल्ड कप २०२४ मध्ये टीम इंडियासाठी सर्व आठ सामने खेळले. पण, ना तो फलंदाजीत दमदार कामगिरी करू शकला, ना गोलंदाजीत काही प्रभाव पाडू शकला. त्याला सात सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, यात त्याने फक्त १ बळी घेतला, तर ५ डावात केवळ ३५ धावा काढल्या. मात्र, अप्रतिम फिल्डिंग करुन त्याने संघासाठी अनेक धावा नक्कीच वाचवल्या.