साऊथम्पटन: भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध येथे १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. त्याआधी तयारी म्हणून विराट सेनेने गुरुवारी पहिल्यांदा जबरदस्त सराव करीत चांगलाच घाम गाळला. खेळाडूंना एकत्र सराव करण्याची प्रथमच परवानगी मिळाली होती. त्याआधी ब्रिटनमध्ये दाखल होताच सर्व खेळाडूंना तीन दिवस हॉटेलमध्ये कठोर क्वारंटाईन व्हावे लागले. या दरम्यान खेळाडू वेगवेगळ्या वेळेत जिममध्ये जायचे शिवाय मैदानावर हलका सराव करीत होते.
बीसीसीआयने खेळाडू सराव करीत असतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. त्यात सर्व खेळाडू मैदानात घाम गाळताना दिसत आहेत. ‘आमच्या संघाचे पहिले सराव सत्र सुरू झाले याची अधिक उत्सुकता आहे. डब्ल्यूटीसी फायनलसाठी टीम इंडियाची तयारी जोरात सुरू आहे,’ असे बीसीसीआयने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले.
सराव सत्रात टीम इंडियाने कोरोनासंबंधित सर्व नियम व मार्गदर्शक सूचना पाळल्या आहेत. सरावादरम्यान विराट कोहली व अन्य खेळाडूदेखील मास्क घालून दिसले. नेट सरावानंतर क्षेत्ररक्षण कोच आर.श्रीधर यांनी खेळाडूंना झेल घेण्याचा सराव दिला. नेट सरावानंतर क्षेत्ररक्षण कोच आर.श्रीधर यांनी खेळाडूंना झेल घेण्याचा सराव दिला.
यांनी केली फटकेबाजी- साऊथम्पटनचे मैदान, ड्यूक्स चेंडू, त्यानंतर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचा सराव व्हिडिओमध्ये दाखविण्यात आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे फलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत. युवा फलंदाज ऋषभ फलंदाजीदरम्यान फटकेबाजी केली.
गोलंदाजही झाले सज्ज- जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाजीचा मारा करताना दिसले. दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने देखील गोलंदाजी सराव केला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची नजर या सर्वांवर होती.