मुंबई : कर्णधार विराट कोहलीने संघाच्या परदेश दौऱ्यावर खेळाडूंच्या पत्नी सोबत असाव्यात या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यात कोहलीने मागणींची यादीच बीसीसीआयकडे दिली आहे. त्यात त्याने इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेदरम्यान केळी आणि रेल्वे प्रवास या अतिरिक्त मागण्या केल्या आहेत. भारतीय खेळाडूंनी या मागण्यांचे पत्र बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडे पाठवल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.
भारतीय संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हा तेथे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने भारतीय खेळाडूंना पसंतीची फळे उपलब्ध करून दिली नव्हती. त्यावर खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत बीसीसीआयच्या खर्चाने केळी उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी खेळाडूंनी केली आहे. त्याचबरोबर अद्ययावत जिम असलेल्या हॉटेलमध्ये बुकिंग करावी, अशीही मागणी खेळाडूंनी केली आहे.
भारतीय संघ दोन महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तेथे भारताने ट्वेंटी-20 मालिका जिंकली, परंतु वन डे आणि कसोटी मालिकेत त्यांना हार पत्करावी लागली. या दौऱ्यातील खेळाडूंच्या कामगिरीची आढावा बैठक नुकतीच हैदराबाद येथे पार पडली. त्या बैठकीला कर्णधार विराट कोहली. उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद उपस्थित होते.
भारतीय क्रिकेटपटूंनी रेल्वे प्रवासाची केलेल्या मागणीने प्रशासकीय समितीच्या भूवया उंचावल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ते धोकादायक असल्याचे त्यांना वाटते. मात्र, इंग्लंडचा संघ रेल्वेनेच प्रवास करत असल्याने कोहलीने सांगितल्यानंतर संघासाठी एक कोच बुक करण्याचा विचार सुरू असल्याचे, सुत्रांनी सांगितले. मात्र, या प्रवासात काही अनुचित घडले तर त्याची जबाबदारी प्रशासकीय समिती किंवा बीसीसीआय स्वीकारणार नाही, ही अट घालण्यात आल्याचे समजते.
Web Title: Team India’s wish for World Cup: rail coach in UK and bananas
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.