मुंबई : इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. या स्पर्धेत मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश भारतीय संघाला महागात पडले. संघ व्यवस्थापन गेल्या अनेक वर्षांपासून चौथ्या क्रमांकासाठी सक्षम पर्याय शोधू शकलेला नाही आणि त्याचा फटका वर्ल्ड कपमध्ये सहन करावा लागला. त्यामुळेच फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची उचलबांगडी झाली. बांगर वगळता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) नेमलेल्या त्रिसदस्यीस समितीनं मुख्य प्रशिक्षकपदासह अन्य पदांवर आहे त्या व्यक्तीचींच फेरनिवड केली. बीसीसीआयच्या या निर्णयावर नाराज असल्याचे बांगर यांनी सांगितले, परंतु त्याचवेळी त्याने चौथ्या क्रमांकाच्या फलंदाज निवडीच्या निर्णय हा माझ्या एकट्याचा नव्हता असे स्पष्टीकरणही दिले.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बांगरने सांगितले की,''माझ्या कार्यकाळात वाढ न झाल्याचे दुःख आहे. पण, त्या गोष्टीचा मी फार विचार करत नाही. मागील पाच वर्षांत संघासोबतच्या चांगल्या आठवणी मी लक्षात ठेवल्या आहेत. आम्ही सलग तिसऱ्या वर्षी कसोटीत अव्वल स्थानावर आहोत. 52 पैकी 30 कसोटी सामने आम्ही जिंकले आणि त्यात 13 परदेशातील कसोटी सामन्यांचा समावेश आहे. तसेच देशात व परदेशात आम्ही वन डे मालिकाही जिंकल्या आहेत. फक्त वर्ल्ड कपची उणीव जाणवत आहे. त्यामुळे निराश होणे साहजिकच आहे. पण, बीसीसीआय आणि सर्व प्रशिक्षक डंकन फ्लेचर, अनील कुंबळे आणि रवी शास्त्री यांनी दिलेल्या संधीबद्दल मी त्यांचे आभार मानते.''
बांगरच्या जागी आता टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी विक्रम राठोडची निवड झाली आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात चौथ्या क्रमांकासाठी सक्षम पर्याय शोधण्यात अपयशी ठरल्याची किंमत बांगरला मोजावी लागली. त्याबद्दल बांगर म्हणाला,''सर्व संघ व्यवस्थापन आणि निवड समितीचा या निर्णयात सहभाग होता. फलंदाजाचा सध्याचा फॉर्म, तंदुरुस्ती, तो डावखुरा आहे की उजवा, तो गोलंदाजी करू शकतो का, इत्यादी. गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता.''