सिडनी : लेगस्पिनर पूनम यादवचे तोंडभरुन कौतुक करीत भारतीय संघ आता दोन-तीन खेळाडूंवर विसंबून नसल्याची प्रतिक्रिया भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने दिली.‘प्रत्येक खेळाडूच्या योगदानाच्या जोरावर आॅस्ट्रेलिया संघाला नमविल्याने माझा संघ आता जेतेपदाचा प्रबळदावेदार बनला,’ असेही हरमनप्रीत म्हणाली.
हरमनप्रीत म्हणाली, ‘पूनमने गोलंदाजीत पुढाकार घेत विजयाची सुरुवात केली. दुखापतीतून सावरल्यानंतर तिच्याकडून शानदार पदार्पणाची अपेक्षा होती. आधी आम्ही दोन- तीन खेळाडूंच्या कामगिरीवर विसंबून असायचो. आता सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय साकारत आहोत. अशीच कामगिरी होत राहिल्यास विश्वचषक जिंकू शकतो. खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल नसल्यामुळेच मला विजयाची खात्री होती.’आॅस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग हिने मधल्या षटकात मोठी भागीदारी न होणे हे पराभवाचे प्रमुख कारण ठरल्याचे मत नोंदविले. भारताने टिच्चून मारा केल्यामुळे विजयावर त्यांचा हक्क होता, असेही तिने सांगितले.गोलंदाजांनी सार्थ ठरविला विश्वास‘स्पर्धेत पहिला सामना जिंकणे सुखद आहे. या खेळपट्टीवर चांगली कामगिरी होईल, असे वाटत होते. १४० धावा काढल्यास गोलंदाज निश्चितपणे बचाव करतील, याचीही खात्री होती. जेमिमा आणि दीप्ती यांच्यातील भागीदारीमुळे मी आनंदी होते,’ असेही हरमनप्रीतने सांगितले.