आशिया चषकाच्या कामगिरीवरच विश्वचषकासाठी व्हावी संघनिवड!

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मुंबईतील एका कार्यक्रमात आगामी वन-डे विश्वचषकातील भारतीय संघाबाबत वक्तव्य केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2023 10:53 AM2023-08-13T10:53:39+5:302023-08-13T10:54:48+5:30

whatsapp join usJoin us
team selection for the world cup should be based on the performance of the asia cup | आशिया चषकाच्या कामगिरीवरच विश्वचषकासाठी व्हावी संघनिवड!

आशिया चषकाच्या कामगिरीवरच विश्वचषकासाठी व्हावी संघनिवड!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मुंबईतील एका कार्यक्रमात आगामी वन-डे विश्वचषकातील भारतीय संघाबाबत वक्तव्य केले. यावेळी विश्वचषकासाठी संघ निवडीत अनेक अडथळे असल्याची कबुलीही त्याने दिली. विश्वचषकाच्या दृष्टीने ज्या खेळाडूंवर फोकस होता, ते अपयशी ठरले. सूर्याला टी-२० तज्ज्ञ मानले जाते. तो वन-डेत अपयशी ठरला होता. मग त्याला संधी तरी किती द्यायला हव्या? रोहितच्या मते, तडकाफडकी निर्णय न घेता आणखी संधी द्यायला हवी. राहुल, श्रेयस यांच्यासारख्या जखमी खेळाडूंबाबतही विचार करावा लागेल.

भारताने घाई करावी

भारतीय निवड समितीने विश्वचषकाच्या दृष्टीने मोठे निर्णय तातडीने घ्यावेत.  आशिया चषकाला या महिन्याअखेर सुरुवात होईल. अशावेळी चांगला संघ निवडण्याची संधी भारतीय संंघ व्यवस्थापनाकडे असेल. हेच खेळाडू विश्वचषकात उपयुक्त ठरू शकतील. सर्वांच्या नजरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर आहेत. तो आयर्लंड दौऱ्यात नेतृत्व करत आहे. या दौऱ्यात फिटनेसच्या कसोटीत उत्तीर्ण झाल्यास आशिया चषकाच्या संघात त्याला स्थान दिले जाईल.

आशिया कपमधील १२ खेळाडू विश्वचषकात...

आशिया चषकासाठी १५ खेळाडूंची निवड केली जाईल. त्यातील किमान १२ खेळाडू विश्वचषक संघात खेळू शकतील. आशिया चषक ही कमकुवत स्पर्धा नाही. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसह बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचे तगडे आव्हान असेल. या सर्वांचा सामना करताना विजय मिळवून देणारा संघ लागेल. त्यामुळे येथूनच विश्वचषकाच्या संघाची बांधणी होऊ शकेल.

अन्य संघांची तयारी भक्कम

विश्वचषकात सहभागी होणाऱ्या अन्य संघांकडे बघा. अनेकांनी आपले खेळाडू जाहीर केले. ऑस्ट्रेलियाचा संघ जवळपास निश्चित झाला. न्यूझीलंडमध्ये ट्रेंट बोल्टचे पुनरागमन झाले. केन विल्यम्सन जखमेतून सावरल्यानंतर पुनरागमनाच्या तयारीत आहे. केन सुरुवातीचे सामने खेळू शकणार नसला तरी त्याचा संघात समावेश गरजेचा असल्याचे क्रिकेट न्यूझीलंडने म्हटले आहे. बांगलादेशने शाकिब अल हसनकडे नेतृत्व सोपविले आहे. पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझमकडे असून, त्यांचे अन्य खेळाडू विश्वचषकासाठी निश्चित झाले आहेत.

चौथ्या स्थानावर कोण?

संघाची सर्वांत मोठी समस्या चौथ्या स्थानावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचा शोध घेणे ही असेल. राहुल आणि श्रेयस पूर्णपणे फिट नाहीत. युवराजसिंगच्या निवृत्तीनंतर चौथ्या स्थानावर भक्कमपणे फटकेबाजी करणारा फलंदाज गवसला नाही, असे रोहितने कबूल केले. सूर्यकुमार यादव, राहुल, श्रेयस हे चौथ्या स्थानाचे दावेदार होते. मग आता तिलक वर्मासारख्या युवा फलंदाजाला हे स्थान देणार का? विंडीजमध्ये तिलकने सुरेख कामगिरी केली.  यशस्वी जैस्वाल हा आणखी एक युवा फलंदाज; पण तो सलामीला खेळतो. यानिमित्ताने व्यवस्थापन आणि निवडकर्ते यांची परीक्षा असेल. विश्वचषकासाठी संघ निवडीचा आधार आशिया चषक असायला हवा. संघातील योग्य संयोजन कसे असायला हवे, हे कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य कोच राहुल द्रविड यांच्याशिवाय कुणालाही कळणार नाही.

 

Web Title: team selection for the world cup should be based on the performance of the asia cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.