भारतात वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे आणि आयसीसीने २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रतेचे निकष जाहीर केले आहेत. या स्पर्धेतील पात्रता निश्चित करण्यासाठी आयसीसीने निकष जाहीर केले आहेत आणि त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत ८ संघ सहभाग घेऊ शकणार आहेत आणि यजमान म्हणून पाकिस्तान आधीच पात्र ठरले आहेत, तर उर्वरित ७ जागांसाठी टक्कर पाहायला मिळणार आहे.
आयसीसीच्या प्रवक्त्याने ESPNcricinfo ला दिलेल्या माहितीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा घेण्याचा निर्णय जेव्हा २०२१मध्ये आयसीसीने घेतला गेला, तेव्हाच ही स्पर्धा ८ देशांची असेल हे ठरले होते. यावरून अनेक क्रिकेट बोर्डांनी आश्चर्य व्यक्त केले होते. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अव्वल ७ संघांनाच चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळता येणार आहे. अशात वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे व आयर्लंड यांचा तर विचारही होणार नाही, कारण हे वर्ल्ड कप खेळत नाहीत. इंग्लंडही या स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता आहे, कारण ते सध्या गुणतालिकेत ९व्या क्रमांकावर आहेत.
नोव्हेंबर २०२१ मध्ये आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दोन आवृत्त्यांसह ( २०२५ आणि २०२९) नवीन सायकलमध्ये ( २०२४-३१) पुरुष आणि महिला संघांसाठी अनेक जागतिक स्पर्धांचे अनावरण केले होते. आयसीसीने म्हटले होते की चॅम्पियन्स ट्रॉफी ही आठ संघांची स्पर्धा असेल आणि मागील आवृत्त्यांचे अनुसरण करून ४-४ संघांचे दोन गट, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असे या स्पर्धेचे स्वरुप असेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या २०१३ व २०१७ आवृत्त्यांसाठी कट-ऑफ तारखेला वन डे क्रमवारीतील शीर्ष आठ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. पण आता २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी या वर्ल्ड कप स्पर्धेतील अव्वल सात संघांचा समावेश करण्याच्या निर्णयाला ICC च्या मुख्य कार्यकारी समितीने मान्यता दिली होती त्यानंतर ICC बोर्डाने या शिफारसीला मान्यता दिली आहे.