Teams qualified directly into the T20 World Cup 2024 - भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ग्रुप २ मधील आजच्या अखेरच्या सामन्यात भारताने ७१ धावांनी झिम्बाब्वेवर विजय मिळवताना ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. नेदरलँड्सने ग्रुप २ मधील आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात धक्कादायक विजयाची नोंद केली आणि दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेबाहेर केले. पाकिस्तानने ४ विकेट्स राखून बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता भारत- इंग्लंड आणि पाकिस्तान-न्यूझीलंड असे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. पण, भारताचा हा विजय नेदरलँड्ससाठी महत्त्वाचा ठरला आणि त्यांनी २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत थेट प्रवेश निश्चित केला.
भारत, पाकिस्तान यांचे उपांत्य फेरीचे प्रतिस्पर्धी ठरले; जाणून घ्या कधी व कुठे होणार हे सामने
नेदरलँड्सने राऊंड १ मध्ये संयुक्त अरब अमिराती ( ३ विकेट्स राखून), नामिबिया ( ५ विकेट्स राखून) यांच्यावर विजय मिळवत Super 12 मधील ग्रुप २ मध्ये स्थान पक्के केले. राऊंड १ मध्ये त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला. ग्रुप २ मध्ये त्यांना भारत, बांगलादेश व पाकिस्तानकडून हार मानावी लागली होती. मात्र, अखेरच्या दोन सामन्यांत त्यांनी झिम्बाब्वे ( ५ विकेट्स राखून) व दक्षिण आफ्रिका ( १३ धावांनी) यांच्यावर विजय मिळवत ४ गुणांची कमाई केली. दक्षिण आफ्रिकेला त्यांनी ठेवलेल्या १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. नेदरलँड्ससाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे आता समोर आले आहे.
२०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप वेस्ट इंडिज व अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. त्यामुळे हे दोन संघ आधीच पात्र ठरले आहेत. त्यात २०२२च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील अव्वल ८ संघही पुढील स्पर्धेत थेट पात्र ठरले. त्यानुसार ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड्स यांनी २०२४च्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे. अफगाणिस्तान व बांगलादेश यांनी ICC रँकींगनुसार थेट प्रवेश पक्का केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"