इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मिनी-लिलाव 23 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. तसंच संघ कोणत्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेईल याची चर्चाही सुरू आहे. दरम्यान, भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनने या लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्या खेळाडूच्या नावाची आणि त्या खेळाडूवर सर्वाधिक पैसे खर्च करणाऱ्या संघाच्या नावाची भविष्यवाणी केली आहे.
रविचंद्रन अश्विननुसार इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर यावेळी लिलावात सर्वात जास्त बोली लावली जाईल. तसंच त्याच्यावर सर्वात जास्त पैसे खर्च करणारी फ्रेंचायझी लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) असू शकते. 'लखनऊ सुपर जायंट्स बेन स्टोक्ससाठी नक्कीच जाईल. जर ते त्याला घेऊ शकत नसतील, तरच ते इतर खेळाडूंसाठी जातील, असे अश्विनने आपल्या युट्युब चॅनलवरील व्हिडीओमध्ये सांगितले.
लखनौ सुपर जायंट्सकडे लिलावासाठी एकूण 23.35 कोटी रुपये शिल्लक आहेत, तर त्यांच्याकडे 4 परदेशी खेळाडूंचे स्लॉट रिक्त आहेत. अशा परिस्थितीत बेन स्टोक्सला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी हा संघ खूप पैसा खर्च करू शकतो. बेन स्टोक्सच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने आयपीएलमध्ये 43 सामने खेळले आहेत आणि 25.56 च्या सरासरीने आणि 134.50 च्या स्ट्राइक रेटने 920 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर दोन शतके आणि दोन अर्धशतके आहेत. स्टोक्सने या स्पर्धेत 28 विकेट्सही घेतल्या आहेत.
या खेळाडूवरही लागू शकते अधिक बोलीआगामी लिलावात वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार निकोलस पूरनवरही मोठी बोली लागू शकते. वेस्ट इंडिजचे कर्णधारपद सोडल्यानंतर पूरननं टी-10 लीगमध्ये तुफान कामगिरी केली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज पूरनला आपल्या संघात समाविष्ट करू शकते, असे अश्विन म्हणाला.