मतीन खान
महान खेळाडू कुठल्याही स्थितीत हार मानत नाही. स्वत:च्या उणिवांविरुद्धची लढाई तो स्वत: लढतो. ८२ कसोटींतील १४० डावांत १२ शतकांसह ३८.५२ च्या सरासरीने ४९३१ धावा करणाऱ्या ३४ वर्षांच्या अजिंक्य रहाणेचे भारतीय संघातील पुनरागमन हीच बाब अधोरेखित करते. अजिंक्य खासगी आयुष्यातही संघर्ष करीत पुढे आला. या संघर्षाची झलक त्याच्या खेळातही दिसते. डोंबिवलीतील मध्यमवर्गीय, सरळमार्गी कुटुंबातून आलेला अजिंक्य गेली दहा वर्षे भारतीय क्रिकेटला बहुमूल्य योगदान देत आहे. पण, माझे हे योगदान अविस्मरणीय आहे, हे सिद्ध करण्यास तो कमी पडला असावा.
अजिंक्यने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत २०२०-२१ ला भारतीय संघाला २-१ ने ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. त्यावेळी भारतीय संघ दौऱ्याच्या सलामीला एक डाव ३६ धावांनी पराभूत झाला. विराटने सुटीचे कारण देत संघाची साथ सोडली होती. अखेरची कसोटी सुरू होण्याआधी जवळपास ८-९ खेळाडू जखमी होऊन बाहेर पडले होते. अशा स्थितीतही अजिंक्यने नेतृत्व पणाला लावताना ऋषभ पंत, शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, नटराजन यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.
त्यानंतर असे काय घडले की अजिंक्यची बॅट अचानक ‘म्यान’ झाली. मेलबोर्नमधील शतकानंतर रहाणेने शतक ठोकलेले नाही. त्यानंतर ३५ डावांत केवळ तीन अर्धशतकी खेळींमुळे सरासरी २० पेक्षा कमी झाली. २०२२ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर अजिंक्यला संघाबाहेर काढण्यात आले. दुसरीकडे श्रेयस अय्यरने धडाकेबाज कामगिरीच्या बळावर संघात स्थान भक्कम केले. अजिंक्यला आयपीएलसाठी सीएसकेने मूळ ५० लाखांत खरेदी केले तेव्हा हा फलंदाज डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारतीय संघात स्थान पटकावेल, असे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते. राहत इंदोरी यांचा शेर रहाणेने संघात स्थान पटकवून सार्थ ठरविला आहे. ते म्हणतात...
‘अभी गनीमत है सब्र मेरा, अभी लबालब भरा नहीं हूँ, वह मुझको मुर्दा समझ रहा है, उससे कहो... मैं मरा नहीं हूँ!’
श्रेयसच्या जखमेमुळे मधल्या फळीत संधी, अन्यथा ही संधी मिळू शकली नसती. सीएसकेसाठी रहाणेने पाच सामन्यांत १९९.४ च्या स्ट्राइट रेटने २०९ धावा केल्या. यावर चाहतेही चकित आहेत. केकेआरविरुद्ध त्याची फटकेबाजी डोळे दीपविणारी होती. त्याने २९ चेंडूत ७१ धावा कुटताना जे फटके मारले, ते पाहताना डिव्हिलियर्सची आठवण झाली. कौशल्य आणि तंत्राच्या बळावर रहाणने काळाची गरज ओळखून स्वत:मध्ये बदल केला. यामुळे निवड समितीला देखील दखल घ्यावी लागली.
(लेखक लोकमत वृत्तसमुहात स्पोर्ट्स हेड-सहायक उपाध्यक्ष आहेत)