नवी दिल्ली : चेंडूला लकाकी देण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी सध्याची उपाययोजना आहे आणि कोविड-१९ महामारीबाबतची स्थिती नियंत्रणात आल्यानंतर परिस्थिती पुन्हा सामान्य होईल, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले.
संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील समितीने थुंकीच्या वापरावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. आयसीसीने क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्या दिशानिर्देशांमध्ये यावर बंदी घालण्याची सूचना केली आहे. स्टार स्पोर्ट््सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात बोलताना कुंबळे म्हणाले,‘ हा केवळ तात्पुरता उपाय आहे आणि काही महिने किंवा वर्षानंतर परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी आशा आहे. त्यानंतर परिस्थिती पूर्वरत होईल.
थुंकीच्या वापरावर बंदी घालण्यात आल्यानंतर गोलंदाजांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते स्विंग मिळविण्यावर निश्चितच परिणाम होईल, पण अनेकांनी याच्या वापरामुळे होणाऱ्या संभाव्य स्वास्थ्य जोखीमेचा स्वीकार केला आहे.
आयसीसीने चेंडू चमकविण्यासाठी ‘वॅक्स’ सारख्या कृत्रिम पदार्थाच्या वापराला परवानगी द्यावी किंवा नाही, याबाबतही चर्चा सुरू आहेत. कुंबळे म्हणाले,‘बाहेरच्या पदार्थाच्या वापराबाबत चर्चा झाली होती. खेळाचा इतिहास बघितला तर आपण टीकाकार ठरलो आहोत. बाहेरच्या पदार्थाला खेळामध्ये स्थान मिळू नये, यावर आपण लक्ष दिले आहे.’ कुंबळे पुढे म्हणाले,‘जर तुम्ही याला वैधता प्रदान करणार असाल तर तुम्ही असे काही करणार आहात की ज्याचा काही वर्षांपूर्वी मोठा प्रभाव होता.’
कुंबळे यांनी २०१८ च्या चेंडू छेडछाड प्रकरणाचा हवाला दिला. त्यामुळे आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व कॅमरन बेनक्रॉफ्ट यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. दक्षिण आफ्रिका व आॅस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेत जे काही घडले त्यावर आयसीसीने निर्णय घेतला, पण क्रिकेट आॅस्ट्रेलियाने त्यापेक्षा कडक धोरण अवलंबले. त्यामुळे आम्ही यावर चर्चा केली.’(वृत्तसंस्था)
गोलंदाजांच्या कौशल्यात सुधारणा होवू शकते : रुट
लंडन : कोविड-१९चे संक्रमण रोखण्याच्या उद्देशाने चेंडू चमकविण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी घालण्यात आल्यामुळे गोलंदाजांच्या कौशल्यामध्ये सुधारणा होऊ शकते, असे मत इंग्लंडचा कर्णधार जो रुटने व्यक्त केले. गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळविण्यासाठी कसून मेहनत घ्यावी लागेल, असे सांगत रुट म्हणाला,‘सर्वसाधारणपणे मिळणारी मदत उपलब्ध नसेल तर तुम्हाला आपल्या अचूकतेमध्ये सुधारणा करावी लागेल. गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळविण्यासाठी अन्य कुठली पद्धत शोधावी लागेल किंवा अधिक मेहनत घ्यावी लागेल. त्यात क्रिजच्या कोनामध्ये बदल, क्रॉस सिमचा वापर आदींचा समावेश असू शकतो.’