ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात आपली निवड झाली नसल्याचं कळाल्यावर सूर्यकुमार यादव निराश झाला होता. आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतरही सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान न मिळणं हे सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी आश्चर्यकारक ठरलं होतं. सूर्यकुमारही खूप चिंताग्रस्त झाला होता. पण त्याचवेळी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याला फोन करुन प्रोत्साहन दिलं. याबाबत खुद्द सूर्यकुमारने माहिती दिली आहे.
मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. याशिवाय स्थानिक क्रिकेटमध्येही त्यांनं चांगल्या धावा कुटल्या होत्या. तरीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या ३२ जणांच्या संभाव्य संघात त्याची निवड होऊ शकली नाही.
'जर तू खेळाप्रती प्रामाणिक आणि सच्चा आहेस, तर नक्कीच एकदिवस खेळही तुझा विचार करेल. कदाचित तुझ्या मार्गातला हा शेवटचा अडथळा असेल. भारतीय संघाकडून खेळण्याचे तुझे स्वप्न अजूनही एका कोपऱ्यात दडून आहे. लक्ष्य केंद्रीत कर आणि स्वत:ला क्रिकेटच्या स्वाधीन कर', असा संदेश सचिनने निराश झालेल्या सूर्यकुमार यादवला दिला.
'मला माहित्येय की तू निराश होऊन प्रयत्न सोडून देणाऱ्यांपैकी नाहीस. प्रयत्न करत राहा आणि आम्हाला तुझ्या दमदार खेळी पाहण्याचा, सेलिब्रेट करण्याचा आनंद देत राहा', असंही सचिनने सांगितल्याचं खुद्द सूर्यकुमारने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सूर्यकुमार यादवचंही नाव होतं. मुंबई इंडियन्सकडून खेळताना १५ इनिंग्जमध्ये त्यानं ४८० धावा केल्या होत्या.
'सचिन सरांच्या एका संदेशानेच माझ्या डोळ्यासमोरचं सगळं चित्र स्पष्ट झालं. जर तुम्ही क्रिकेटशी प्रमाणिक आहात. तर तुमचा कधी ना कधी विचार केलाच जाईल यात शंका नाही हे मला जाणवलं. ज्या व्यक्तीने संपूर्ण जगाला आपल्या क्रिकेटमधून २४ वर्ष सर्वांना आनंद दिला. यात अनेकदा बरे-वाईट प्रसंगांनाही सामोरं जावं लागलं, अशा व्यक्तीकडून आपली दखल घेतली जाते हेच माझ्यासाठी खूप आहे', असंही सूर्यकुमार म्हणाला.