नवी दिल्लीः गरजूंच्या मदतीला धावून जाण्याची आपल्या संस्कृतीची शिकवण लक्षात ठेवून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अनेकांना सहकार्याचा हात देत असतो. यावेळी तो भारताच्या व्हीलचेअर क्रिकेट संघासाठी देवासारखा धावून गेला. त्याच्या मदतीमुळेच हे दिव्यांग क्रिकेटपटू बांगलादेश दौऱ्यावर जाऊ शकले. विशेष म्हणजे, त्यांनी तिथल्या मालिकेत जेतेपद पटकावून सचिननं आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.
सचिन तेंडुलकरने आम्हाला विमानाची तिकिटं काढून दिली आणि आर्थिक मदतही केली. तो पुढे आला नसता, तर आमचं बांगलादेशला जाणं आणि क्रिकेट खेळणं शक्यच झालं नसतं. या मदतीबद्दल आम्ही सचिनचे नेहमीच ऋणी राहू, अशा भावना प्रदीप राज यांनी व्यक्त केल्या. भारतात व्हीलचेअर क्रिकेट सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. बीसीसीआय किंवा आयसीसीकडून आपल्या संघाला कुठलंही सहकार्य मिळत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बांगलादेशात तीन सामन्यांची मालिका भारताने २-० अशी जिंकली. एक सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावा लागला. जेतेपदाची ट्रॉफी घेऊन भारताचे वीर ९ मे रोजी दिल्लीत परतले. या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे आणि त्याचं श्रेय ते सचिनला देतात.
व्हीलचेअर क्रिकेटचे बहुतांश नियम हे सामान्य क्रिकेटमधील नियमांसारखेच आहेत, फक्त सीमारेषा ४५ मीटरवर असते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही व्हीलचेअर क्रिकेटच्या स्पर्धा होता. भारतीय वीरांच्या बांगलादेशातील कामगिरीनंतर तरी बीसीसीआयनं त्यांची दखल घ्यायला हवी, असं क्रिकेटप्रेमींना वाटतंय.