नवी दिल्ली : अधांतरी असलेली कसोटी चॅम्पियनशिप पूर्ण करण्याचा उपाय मास्टर फलंदाज सचिन तेडुलकर याने सुचवला आहे. चॅम्पियनशिप पूर्ण करण्यासाठी आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक परिषदेकडून शिकण्यासारखे आहे, असे सचिन म्हणाला. आयओसीने कोरोनामुळे टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन वर्षभरासाठी लांबणीवर टाकले.
सचिनच्या मते, ‘कोणत्याही आंतरराष्टÑीय क्रिकेटपटूसाठी खरे आव्हान कसोटी क्रिकेट आहे. लॉकडाऊनमुळे सध्या सर्वच क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या. अशावेळी विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना २०२१ ला लॉर्डसवर खेळविण्यास हरकत नाही. चॅम्पियनशिपचे पहिले सत्र निर्विघ्वनपणे पार पाडायचे झाल्यास आयओसीच्या पावलांवर पाऊल टाकायला हवे.’
सचिनने चॅम्पियनशिपचे नव्याने आयोजन करण्याची सूचना मूर्खपणाची असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘पुन्हा सुरू करण्यापेक्षा एकदा सुरू झालेली स्पर्धा पारदर्शी पद्धतीने सुरू राहावी, सर्वांना संधी मिळावी या हेतूने उर्वरित सामने आटोपण्यात यावेत. स्पर्धेची कालमर्यादा वाढविणे शक्य आहे. टोकियो आॅलिम्पिक लांबणीवर टाकण्यात आली तरी २०२१ ला ‘टोकियो आॅलिम्पिक २०२०’ असेच संबोधले जाणार आहे. आयसीसीनेदेखील हाच कित्ता गिरवण्यास हरकत नाही.’
खेळाडूच्या निवडीचे निकष वय असावे की फिटनेस, याविषयीदेखील सचिनने मत मांडले. तो म्हणाला, ‘जगात सर्वत्र खेळाडूंच्या फिटनेसचा स्तर उंचावत आहे. सिनियर्स युवा खेळाडूंचा मार्ग रोखतात का, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. मी या भानगडीत पडू इच्छित नाही, मात्र निवडीचे निकष फिटनेस असायला हवे. वयाचा प्रश्न नको. जो फिट असेल तो खेळेल. संघ व्यवस्थापनाने तो निर्णय घ्यायला हवा.’