मुंबई : देशातील युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासह त्यांना आपल्या प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अनुभवाचा फायदा करून देण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली नवी जबाबदारी देणार आहेत. यासह बीसीसीआयमध्ये सचिनचाही प्रवेश होईल, अशी माहिती मिळत आहे.
बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गांगुली यांनी माजी कर्णधार राहुल द्रविडचीही भेट घेतली होती. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख म्हणून द्रविडवर जबाबदारी दिल्यानंतर गांगुली आता सचिनवरही मोठी जबाबदारी सोपविणार आहेत. युवा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास खेळाडू आणि एक व्यक्ती म्हणून ते चांगला आदर्श निर्माण करू शकतील. यासाठीच युवांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सचिनवर येऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोष्टीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ही गोष्ट प्रत्यक्षात कशी आणणार आणि त्याचे परिणाम कसे होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षाही करावी लागेल. रिषभ पंत, पृथ्वी शॉ, शुभमान गिल यांसारख्या उदयोन्मुख खेळाडूंना सचिन मार्गदर्शन करेल. सचिनकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा २४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, या कामासाठी त्याच्याहून योग्य व्यक्ती कोणीच नसेल.