नवी दिल्ली : दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘चार दिवसीय कसोटी’ प्रस्तावाला विरोध केला. आयसीसीने या प्रारुपासोबत छेडखानी करू नये, असे आवाहन करताना सचिनने यात अखेरच्या दिवशी फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे म्हटले.विराट कोहली, रिकी पाँटिंग, जस्टिन लँगर व नॅथन लियोन यांच्यासारख्या स्टार खेळाडूंनीही या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. सचिन म्हणाला, ‘मी कसोटी क्रिकेटचा समर्थक असल्याने या प्रारुपासोबत छेडछाड करण्यात यावी, अशी माझी इच्छा नाही. कसोटी क्रिकेट पूर्वीप्रमाणेच खेळले गेले पाहिजे.’ सचिनच्या मते एक दिवस कमी झाल्यामुळे फलंदाज विचार करतील की कसोटी क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा विस्तार झाला आहे. २०० कसोटी खेळणारा एकमेव क्रिकेटपटू असलेल्या सचिनने म्हटले की,‘फलंदाज विचार करतील की हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे मोठे स्वरुप आहे. कारण जर तुम्ही दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत फलंदाजी केली, तर तुमच्याकडे अडीच दिवसांचा वेळ शिल्लक राहील. त्यामुळे या खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.’‘एक दिवसाचा अवधी कमी झाल्यामुळे फिरकीपटूंना छाप पाडण्याची संधी मिळणार नाही, ही चिंतेची बाब आहे,’ असेही सचिनने सांगितले. याविषयी त्याने पुढे म्हटले की, ‘फिरकीपटूंना पाचव्या दिवशी गोलंदाजीची संधी न मिळणे म्हणजे वेगवान गोलंदाजांना पहिल्या दिवशी संधी न मिळण्यासारखेच आहे. जगात असा कुठलाच गोलंदाज नसेल की जो पाचव्या दिवशीच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यास इच्छुक नसेल.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- चारदिवसीय कसोटीला सचिनचा विरोध
चारदिवसीय कसोटीला सचिनचा विरोध
दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘चार दिवसीय कसोटी’ प्रस्तावाला विरोध केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 4:28 AM