IND vs SA Test (Marathi News) : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतून विराट कोहली, रोहित शर्मा हे स्टार फलंदाज भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. विराटच्या खेळीची सर्वांना प्रतीक्षा आहे. विराटने वन डे वर्ल्ड कप गाजवताना विश्वविक्रमी कामगिरी केली. वर्ल्ड कपनंतर तो विश्रांतीवर गेला आणि कसोटी मालिकेतून तो पुनरागमन करतोय. दक्षिण आफ्रिकेच्या मागील दौऱ्यावर विराटच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली कसोटी जिंकली होती, परंतु पुढील २ कसोटींत हार पत्करावी लागल्याने ही मालिका २-१ अशी गमवावी लागली. पाठीच्या दुखापतीमुळे विराटला दुसरी कसोटी खेळता आली नव्हती.
ऋतुराज गायकवाडची माघार, संघात दाखल झाला २२ शतकं ठोकणारा तगडा फलंदाज
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. पण, यंदा हा पराक्रम होईल अशी अपेक्षा आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेंटी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली, तर लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली वन डे मालिका २-१ अशी जिंकली. आता कसोटी मालिकेत भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वाखाली इतिहास घडविण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. या मालिकेपूर्वी विराट व रोहितने स्टार स्पोर्ट्स वाहिनीला मुलाखत दिली. वन डे वर्ल्ड कपनंतर विराटची ही पहिलीच मुलाखत आहे. कसोटी क्रिकेट खेळल्याने कामाचे समाधान मिळते असे विराट म्हणाला.
"माझ्यासाठी कसोटी हा क्रिकेटचा पाया आहे. त्याला इतिहास आहे, संस्कृती आहे, वारसा आहे. तुम्ही चार-पाच दिवस जेव्हा कसोटी खेळता तेव्हा ती तुम्ही अनुभवलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा वेगळी भावना आहे. एक व्यक्ती, एक संघ म्हणून, दीर्घ खेळी खेळून आपल्या संघाला कसोटी सामना जिंकून दिल्याचे समाधान ही एक विशेष भावना आहे. मी एक परंपरावादी आहे त्यामुळे कसोटी क्रिकेट खेळणे हे सर्व काही आहे. शंभरहून अधिक कसोटी खेळण्याचा खरोखरच सन्मान आहे,''असे विराट म्हणाला.
विराट कोहली ४ दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणास्तव मायदेशी परतला होता. तो पहिल्या कसोटीपूर्वी पुन्हा आफ्रिकेत येईल, असे बीसीसीआयने सांगितले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना ऋतुराज गायकवाडच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्याचे स्कॅनिंग करण्यात आले आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला उर्वरित दौऱ्यातून माघार घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या दुखापतीच्या पुढील व्यवस्थापनासाठी तो NCAमध्ये दाखल होणार आहे. ऋतुराजच्या जागी निवड समितीने अभिमन्यू ईश्वरनची निवड केली आहे.
Web Title: "Test cricket for me is the foundation of the game": Virat Kohli's 1st Interview After World Cup Final Loss
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.