दुबई : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीत पाऊस खलनायक ठरला. पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथील कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. शेवटच्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही. अशा स्थितीत भारताने जवळपास जिंकलेल्या कसोटीवर पाणी सोडावे लागले. भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली.
दुसरी कसोटी अनिर्णीत राहिल्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५च्या नवीन चक्रातील गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. पहिली कसोटी जिंकून भारताचे १२ गुण झाले. एक कसोटी जिंकल्यास संघाला १२ गुण मिळतात आणि बरोबरीत सुटल्यास सहा गुण मिळतात आणि अनिर्णीत राहिल्यास चार गुण मिळतात. अशा स्थितीत शेवटच्या दिवशी पावसाचा सर्वाधिक फटका भारताला बसला, कारण संघाला वेस्ट इंडीजबरोबर चार गुण शेअर करावे लागले. जर शेवटच्या दिवशी खेळ झाला असता आणि भारताने विंडीजला ऑल आऊट करून दुसरी कसोटी जिंकली असती तर टीम इंडियाला १२ गुण मिळाले असते. अशा परिस्थितीत, डब्ल्यूटीसीच्या या फेरीत भारताचे एकूण गुण २४ झाले असते आणि त्यामुळे टीम इंडियाला आणखी मदत झाली असती. मात्र, हे होऊ शकले नाही.
अनिर्णीत लढतीमुळे भारताच्या जय-पराजयाची टक्केवारी (६६.६७ ) घटली. दुसरीकडे गाले कसोटीत लंकेवर चार गड्यांनी नोंदविलेल्या विजयामुळे पाकिस्तान शंभर टक्के रेकॉर्डसह अव्वल स्थानी विराजमान झाला.
ॲशेस खेळणारा सध्याचा डब्ल्यूटीसी चॅम्पियन ऑस्ट्रेलिया (५४.१७) तिसऱ्या आणि २९.१७ टक्क्यांसह इंग्लंड चौथ्या स्थानी आहे. विंडीजची टक्केवारी वाढून १६.६७ टक्के झाली. हा संघ पाचव्या, तर एका पराभवामुळे श्रीलंका नवव्या स्थानावर घसरला. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या चक्रात अद्याप एकही सामना खेळले नाहीत.