ब्रिजटाऊन : कर्णधार जो रूटच्या दमदार दीड शतकानंतर अष्टपैलू बेन स्टोक्सने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला डाव १५०.५ षटकांमध्ये ९ बाद ५०७ धावांवर घोषित केला. विंडीजने तिसऱ्या दिवशी ६० षटकांत ३ बाद १३५ धावा अशी मजल मारली. विंडीज अजूनही ३७२ धावांनी मागे आहे.
इंग्लंडच्या मॅथ्यू फिशरने आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्याच चेंडूवर जॉन कॅम्पबेलला (४) बाद करून विंडीजला पहिला धक्क दिला. यानंतर कर्णधार क्रेग ब्रेथवेट आणि शमारह ब्रूक्स (३९) यांनी ५७ धावांची भागीदारी केली. फिरकीपटू जॅक लीचने ब्रूक्सला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर एनक्रूम बोनरही (९) लगेच बाद झाला. ब्रेथवेटने १७९ चेंडूंत ५३ धावांची संयमी खेळी करताना ६ चौकार मारले.
त्याआधी, स्टोक्सने विंडीजची धुलाई केली. रूट ३१६ चेंडूंत १४ चौकारांसह १५३ धावा करून परतला.
रूट-स्टोक्स यांनी चौथ्या गड्यासाठी १२९ धावांची शानदार भागीदारी केली. केमार रोचने रूटला बाद केल्यानंतर इंग्लंडला ठरावीक अंतराने धक्के बसले. मात्र, एक बाजू लावून धरलेल्या स्टोक्सने १२८ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी करत १२० धावांची आक्रमक खेळी केली. बेन फोक्स (३३) आणि ख्रिस वोक्स (४१) यांनीही मोक्याच्या वेळी मोलाची खेळी केल्याने इंग्लंडला ५०० चा पल्ला पार करता आला.
स्टोक्सचा कारनामा!
बेन स्टोक्सने ११४ चेंडूंत आपले ११ वे कसोटी शतक पूर्ण केले. २०२० सालानंतर त्याने पहिल्यांदाच कसोटी शतक झळकावले.
त्याने आपल्या या शानदार खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये ५००० धावाही पूर्ण केल्या. यासह तो कसोटीमध्ये ५००० धावा आणि १५० हून अधिक बळी घेणारा पाचवा अष्टपैलू ठरला. याआधी अशी विक्रमी कामगिरी गारफिल्ड सोबर्स (वेस्ट इंडिज), इयान बोथम (इंग्लंड), कपिलदेव (भारत) आणि जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) यांनी केली आहे.
इंग्लंड (पहिला डाव) : १५०.५ षटकांत ९ बाद ५०७ धावा (घोषित) (जो रूट १५३, बेन स्टोक्स १२०, डॅन लॉरेन्स ९१; पेरामॉल ३/१२६, रोच २/६८.) वेस्ट इंडिज (पहिला डाव) : ६० षटकांत ३ बाद १३५ धावा (क्रेग ब्रेथवेट खेळत आहे ५३, शमारह ब्रूक्स ३९; स्टोक्स १/७, मॅथ्यू फिशर १/२०, जॅक लीच १/५३.)
Web Title: Test match - England set up a run against the West Indies
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.