Join us  

धोनीच्या धुरंधरांची अग्निपरीक्षा, पहिला क्वालिफायर आज : सीएसकेपुढे गतविजेत्या गुजरातचे आव्हान

गुजरातने यंदा चेपॉकवर एकही सामना खेळलेला नाही. चेन्नईने येथे सात सामने खेळले खरे पण प्रत्येकवेळी खेळपट्टीचे स्वरूप वेगळे जाणवले. गुजरातविरुद्ध ही खेळपट्टी कशी असेल याचा वेध घेणे कठीण आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 5:29 AM

Open in App

- अयाज मेमनचेन्नई : महेंद्रसिंग धोनीला चाणाक्ष रणनीतिकार मानले जाते, पण त्याचा चेन्नई सुपरकिंग्स संघ मंगळवारी आयपीएल-२०२३ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध खेळेल तेव्हा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सलामीचा फलंदाज शुभमन गिल याची घोडदौड राेखण्यासाठी अनुभव आणि ताकद पणाला लावावी लागणार आहे. ज्याची मानसिकता भक्कम त्याचे पारडे जड असेल. आव्हानात्मक क्षणी जो संघ संयम दाखवेल, त्याच्या पारड्यात विजयश्री पडू शकते.

 गुजरातने यंदा चेपॉकवर एकही सामना खेळलेला नाही. चेन्नईने येथे सात सामने खेळले खरे पण प्रत्येकवेळी खेळपट्टीचे स्वरूप वेगळे जाणवले. गुजरातविरुद्ध ही खेळपट्टी कशी असेल याचा वेध घेणे कठीण आहे. 

गुजरात संघदेखील सीएसकेच्या पावलांवर पाऊल टाकून वाटचाल करीत असतो. त्यांचे व्यवस्थापन आणि प्रशासन क्रिकेटमध्ये दखल देत नाही. अनेक निर्णय आशिष नेहरा, गॅरी कर्स्टन आणि विक्रम सोळंकी हे घेतात. हार्दिक पांड्याचे नेतृत्वदेखील धोनीसारखे तरबेज मानले जाते. गुजरात संघदेखील अंतिम एकादशमध्ये मोठे बदल करण्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे सारखी रणनीती असलेल्या संघांमध्ये ही लढत चुरशीची होईल, असे दिसते.

 गुजरात टायटन्स शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने दोन शतके झळकविली. आरसीबीविरुद्ध त्याने ठोकलेल्या नाबाद शतकामुळे विराट कोहलीची शतकी खेळी झाकोळली होती. राशीद खान जगभर टी-२० खेळतो. त्याच्याकडे गोलंदाजीसोबतच फलंदाजीच्या बळावर सामना फिरविण्याची क्षमता आहे. हार्दिक पांड्याने आरसीबीविरुद्ध गोलंदाजी- फलंदाजी केली नाही, मात्र क्वालिफायरमध्ये त्याची भूमिका मोलाची ठरेल. त्याच्याकडे अनुभव आणि प्रतिभादेखील आहे. चेन्नई सुपर किंग्स ऋतुराज गायकवाड हा डेवोन कॉन्वे सोबत संघासाठी सलामीला उत्कृष्ट सुरुवात करून देत आहे. रवीद्र जडेजा हा अष्टपैलू म्हणून निर्णायक भूमिका वठवू शकतो. मोईन अली हा अनुभवी असून सीएसकेकडून दमदार कामगिरीचा त्याचा रेकॉर्ड आहे. फिरकीविरुद्ध तो धावा काढण्यात तरबेज मानला जातो.

खेळपट्टीचे स्वरूप मंदचेपॉकच्या खेळपट्टीचे मंद स्वरूप ओळखून धावा काढणे गुजरातसाठी आव्हान असेल.  पॉवर प्लेमध्ये दीपक चाहर तर डेथ ओव्हरमध्ये  मथिसा पथिराना यांचा मारा सामन्यात महत्त्वाचा असेल. अशावेळी हार्दिक आणि नेहरा यांना श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याच्याकडून सल्ला घ्यावा लागेल. शनाकाला अष्टपैलू म्हणून संधी दिली जाईल, पण नाणेफेकीचा कौल पाहून डावखुरा फिरकीपटू साईकिशोर यालादेखील संधी मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

 प्ले ऑफ लढतीक्वालिफायर-१ , मंगळवार २३ मे २०२३गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्सस्थळ : एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, वेळ :  सायंकाळी ७.३० पासून

एलिमिनेटर, बुधवार, दि. २४ मे २०२३मुंबई इंडियन्स वि. लखनौ सुपर जायंट्सस्थळ : एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, वेळ : सायंकाळी ७.३० पासून

क्वालिफायर-२, शुक्रवार, दि. २६ मे २०२३क्वालिफायर १ मधील पराभूत वि. एलिमिनेटरमधील विजेतास्थळ : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, वेळ : सायंकाळी ७.३० पासून

अंतिम सामना, रविवार, २८ मे २०२३क्वालिफायर १ मधील विजेता वि. क्वालिफायर २ मधील विजेतास्थळ : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, वेळ : सायंकाळी ७.३० पासून

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीगुजरात टायटन्स
Open in App