Join us  

कसोटी क्रमवारी: रविचंद्रन अश्विन अव्वल स्थानी कायम, बुमराह चौथ्या स्थानी, अष्टपैलूंमध्ये जडेजा टाॅप

ICC Test rankings: भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. त्याच वेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अष्टपैलूमध्ये रवींद्र जडेजा अव्वल आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 8:29 AM

Open in App

दुबई - भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. त्याच वेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अष्टपैलूमध्ये रवींद्र जडेजा अव्वल आहे. 

इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात अश्विनने सहा गडी बाद केले होते. त्याच्या नावावर ८५३ रेटिंग गुण आहेत. बुमराहनेही या सामन्यात सहा गडी बाद केले होते. त्यामुळे तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गोलंदाजीत अव्वल दहामध्ये तिसरा भारतीय रवींद्र जडेजा असून, तो सहाव्या क्रमांकावर आहे. कसोटीतील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही जडेजा अव्वल क्रमांकावर आहे.  

अष्टपैलू खेळाडूंमध्ये इंग्लंडचा जो रूट चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे, गोलंदाजीत त्याने शानदार कामगिरी कायम राखल्यास तो या क्रमवारीतील अव्वल तीन खेळाडूंना कडवी टक्कर देईल. अव्वल तीन खेळाडूंमध्ये जडेजासह अश्विन आणि शाकीब अल हसन यांचा समावेश आहे.

दमदार फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रूटने हैदराबाद कसोटीत पाच बळी घेतल्या होत्या. त्याने दुसऱ्या डावात गोलंदाजीची सुरुवातही केली होती. अक्षर पटेल या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर घसरला आहे.

फलंदाजांमध्ये विराट सहावा दिग्गज फलंदाज विराट कोहली सहाव्या स्थानासह अव्वल दहामध्ये एकमेव भारतीय आहे. भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १९६ धावांची खेळी करणारा इंग्लंडचा ओली पोप २० स्थानांच्या प्रगतीसह १५व्या क्रमांकावर पोहोचला. पोपचा सहकारी बेन डकेट हाही पाच क्रमांकाच्या  प्रगतीसह २२व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत अर्धशतक केले होते. दोन स्थानांच्या प्रगतीसह तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

विंडिजच्या गोलंदाजांची प्रगती ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार गोलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी क्रमवारीतही सुधारणा केली.  केमार रोच दोन स्थानांच्या प्रगतीसह १७व्या, अल्झारी जोसेफ चार स्थानांच्या प्रगतीसह ३३व्या आणि गाबामध्ये सामनावीर ठरलेला शामार जोसेफ ४२ स्थानांच्या प्रगतीसह ५०व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

टॅग्स :आर अश्विनआयसीसीभारतीय क्रिकेट संघ