दुबई : भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बुधवारी जाहीर झालेल्या कसोटी क्रमवारीत गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंमध्ये दुसरे स्थान कायम राखले आहे. रवींद्र जडेजा अष्टपैलूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे फलंदाजांच्या यादीत क्रमश: पाचव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. रोहितचे ७९७ आणि विराटचे ७५६ गुण आहेत. फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन ९१५ गुणांसह पहिल्या, जो रुट ९०० गुणांसह दुसऱ्या, न्यूझीलंडचा केन विलियम्सन ८७९ आणि स्टीव्ह स्मिथ ८७७ गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. रोहित, डेव्हिड वाॅर्नर, कोहली, दिमुथ करुणारत्ने, बाबर आझम आणि ट्राविस हेड हे अव्वल दहामध्ये आहेत.
कसोटी गोलंदाजांत अव्वल दहामध्ये स्थान मिळविणारा अश्विन एकमेव भारतीय आहे. त्याचे ८८३ गुण असून, अव्वल स्थानावर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आहे. शाहीन आफ्रिदी तिसऱ्या, टिम साऊदी चौथ्या, तर जेम्स ॲन्डरसन पाचव्या स्थानावर आला. इंग्लंडविरुद्ध मेलबोर्न कसोटीत ७ धावांत ६ गडी बाद करणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलॅन्ड याचे २७१ गुण असून, तो ७४व्या स्थानी आला. कसोटी क्रमवारीत भारत १२४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंड दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे.