बेंगळुरू : राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सी (नाडा) बेंगळुरूमध्ये दुलिप ट्रॉफी स्पर्धेच्या पुढील लढतीदरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डासोबत संलग्न असलेल्या खेळाडूंच्या चाचणीला प्रारंभ करणार आहे. नाडाने प्रमुख डोप नियंत्रण अधिकाऱ्यांमध्ये (डीसीओ) योग्य चिकित्सकांचा समावेश करण्याची बीसीसीआयची मागणी मान्य केली आहे.अलीकडेच बीसीसीआयचे महाव्यवस्थापक (क्रिकेट परिचालन) साबा करीम आणि डोपिंग विरोधी समितीचे प्रमुख डॉ. अभिजित साळवी यांनी नाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली. त्यावेळी महासंचालक नवीन अग्रवाल उपस्थित होते. नाडाने बैठकीनंतर स्पष्ट केले की,‘आम्ही लवकरच आपल्या कार्यास दुलिप ट्रॉफी स्पर्धेपासून सुरुवात करू अशी आशा आहे.’दरम्यान, नाडा बेंगळुरूमध्ये इंडिया ब्ल्यू व इंडिया ग्रीन संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या सलामी लढतीत कुठल्याही खेळाडूची चाचणी घेणार नाही. दरम्यान, काही चाचण्या २३ आॅगस्टपासून प्रारंभ होणाºया दुसºया लढतीदरम्यान घेतल्या जाण्याची शक्यता आहे.बीसीसीआयने यंदाच्या मोसमातील स्थानिक सामन्यांचा कार्यक्रम नाडाला सोपविला अहे. त्यात तारीख व स्थळाचा समावेश आहे. त्यामुळे नाडाला चाचणीसाठी आपला क्रिकेट कार्यक्रम तयार करण्यासाठी मदत होईल. साळवी म्हणाले, ‘दुलिप ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. कदाचित ते पुढील सामन्यांमध्ये चाचणी घेतील. कुठल्या प्रकारची चाचणी राहील हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. सामन्यादरम्यान काही खेळाडूंची चाचणी घेण्याची शक्यता आहे.’इंडिया ब्ल्यू विरुद्ध इंडिया ग्रीन या पहिल्या सामन्यातील दुसरा दिवस रविवारी पावसामुळे होऊ शकला नाही. पावसामुळे मैदान खेळण्यायोग्य न राहिल्याने दिवसभरात एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. दुपारपर्यंत मैदानाची स्थिती सुधारण्यासाठी प्रतीक्षा केल्यानंतर अखेर २ वाजता पंचांनी खेळ रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.