Join us  

Womens Asia Cup 2022: गतविजेत्या बांगलादेशला पावसानं बुडवलं! थायलंडने पहिल्यांदाच गाठली उपांत्यफेरी 

बांगलादेशच्या धरतीवर महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 6:12 PM

Open in App

सिल्हेट : बांगलादेशच्या धरतीवर महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. आज होणाऱ्या बांगलादेश आणि यूएई यांच्या सामन्यात पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली, त्यामुळे थायलंडच्या संघाला मोठा फायदा झाला आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला आणि गतविजेता बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला. त्यामुळे भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यानंतर उपांत्यफेरीत प्रवेश करणारा थायलंडचा चौथा संघ ठरला आहे. बांगलादेशचा संघ स्पर्धेतील त्यांचा शेवटचा सामना यूएईविरुद्ध खेळणार होता. लक्षणीय बाब म्हणजे हा सामना सहज जिंकून बांगलादेशचा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला असता कारण त्यांचा नेट रनरेट थायलंडपेक्षा चांगला होता. पण झाले भलतेच पावसामुळे सामना रद्द झाला आणि बांगलादेश गुणतालिकेत 5 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला. तर थायलंडने 6 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला.

थायलंडने जिंकले 3 सामने थायलंडसाठी आशिया चषकाची सुरूवात चांगली झाली नव्हती. मात्र सुरूवातीचे दोन सामने हरल्यानंतर संघाने जोरदार कमबॅक केला. या स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना राऊंड रॉबिनच्या आधारावर खेळला गेला जो गतविजेत्या बांगलादेशविरूद्ध होता, ज्यात त्यांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर श्रीलंकेने थायलंडचा 49 धावांनी पराभव केला.

थायलंडने सुरूवातीचे 2 सामने गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले आणि विजयाची हॅटट्रिक मारली. यादरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या संघाला धूळ चारली. थायलंडने तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या विजयामुळे संघाचे मनोबल उंचावले आणि त्यांनी पुढील दोन सामन्यात यूएई आणि मलेशियाचा पराभव केला. मात्र मागील सामन्यात त्यांना बलाढ्य भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भारत-थायलंड यांच्यात होणार सामना तर बांगलादेशला लीग स्टेजमधील सामन्यांमध्ये फक्त 2 विजय मिळवता आले. हे दोन्ही सामने त्यांनी थायलंड आणि मलेशिया यांसारख्या संघाविरूद्ध जिंकले आहेत. महिला आशिया चषकाच्या लीग स्टेजमधील शेवटचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात झाला. या सामन्यात पाकिस्तानी संघाने 7 बळी राखून मोठा विजय मिळवला. त्यामुळे पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारत आणि थायलंड आमनेसामने असणार आहेत. तर दुसऱ्या उपांत्यफेरीचा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. 

 

टॅग्स :एशिया कप 2022भारतभारतीय महिला क्रिकेट संघथायलंडबांगलादेश
Open in App