- जितेंद्र कालेकर ठाणे - भागीदारी करारनाम्याच्या आधारे तसेच बँकेतून कर्ज देण्याच्या नावाखाली २६० बँक खात्यातून तब्बल १६ हजार १६० कोटी ४१ लाख ९२ हजारांची उलाढाला करणाऱ्या केदार दिघे (४१, रा. खारघर, नवी मुंबई) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त राजेश दाभाडे यांनी शुक्रवारी दिली. या तिघांनाही पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वागळे इस्टेट भागातील सेफेक्स पेआऊट कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करून २५ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या फसवणुकीतील २५ कोटींच्या रकमेपैकी एक कोटी ३९ लाख १९ हजार २६४ इतकी रक्कम रियाल एंटरप्रायजेसच्या नावावरील एचडीएफसी बँक खात्यात वळती झाल्याचे पोलिसांना आढळले होते. त्याच आधारे केलेल्या तपासात रियाल एंटरप्रायजेसच्या नवी मुंबईतील वाशी आणि बेलापूर कार्यालयात २६० बँक खाती आणि विविध संस्थांची भागीदारी करारनामे आढळले. या करारनाम्यांपैकी नौपाडा भागातील बालगणेश टॉवर या पत्त्यावर विविध व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे पाच भागीदारी संस्था स्थापन केल्याचेही आढळले.
यातील बँक खात्यांमधूनच हे १६ हजार १८० कोटींचे व्यवहार झाल्याचे आढळले. यातलीच काही रक्कम परदेशातही पाठविली आहे. कर्ज काढून देण्याच्या आमिषाने काही मजूर वर्गाकडून घेतलेल्या केवायसीच्या कागदपत्रांच्या आधारेच संस्था काढून त्यांच्या नावाने काढलेल्या बँक खात्यांवर हे हजारो कोटींचे व्यवहार झाले. याच प्रकरणात आता गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले आणि पोलिस उपायुक्त राजेश दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश राठोड यांच्या पथकाने केदार दिघे याच्यासह संदीप नकाशे (३८, रा. सांताक्रूझ, मुंबई) आणि राम बोहरा (४७, रा. दादर, मुंबई) या तिघांना २६ ऑक्टाेबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अटक केली. यामध्ये या तिघांनी कशाप्रकारे पैशांची उलाढाल केली, परदेशात कोणाला पैसे पाठविण्यात आले, त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत, याचा तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.