मेलबर्न : टी-२० विश्वचषक २०२२ च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ नेदरलॅंड्सविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी सिडनीला पोहोचला आहे. २७ ऑक्टोबरला होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय संघ सराव सत्रांमध्ये भाग घेणार आहे. याचदरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मेलबर्न ते सिडनी या संघाच्या प्रवासाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मूळचे तामिळनाडूचे खेळाडू कार्तिक आणि अश्विन यांच्यातील मजेशीर संवादाचा व्हिडीओ समोर आला आहे. मेलबर्न विमानतळावर दिनेश कार्तिकनेआर अश्विनचे आभार मानले आहेत.
दरम्यान, काल मला वाचवल्याबद्दल धन्यवाद अश्विन, असे दिनेश कार्तिकने म्हटल्याचा संवाद व्हायरल होत आहे. कार्तिकने थँक्स म्हटल्यावर अश्विन हसला आणि तमिळमध्ये म्हणाला, "एथवाडू करूथा पेसलमे", म्हणजेच काहीतरी अर्थपूर्ण बोल अर्थात समजेल असे बोल. एवढ्यात कार्तिक अश्विनची पाठ थोपाटतो आणि चालण्याआधी कूल ॲंन्ड काल्म असे म्हणतो.
कार्तिकने मानले अश्विनचे आभार हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि चाहत्यांनाही तो खूप आवडला आहे. भारतीय संघाने विश्वचषकात विजयी सलामी दिली आहे. खरं तर पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातील अखेरच्या षटकांत ६ चेंडूत १६ धावांची गरज होती. षटकाच्या पहिल्याच चेंडूत हार्दिक पांड्या बाद झाला. नंतर कोहलीने षटकार मारून डाव सावरला आणि कार्तिक स्ट्राईकवर असताना भारताला विजयासाठी २ चेंडूत २ धावांची गरज होती. मात्र तेवढ्यात कार्तिक मोठा फटकार खेळताना बाद झाला त्यानंतर आलेल्या रवीचंद्रन अश्विनने अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. यावरूनच मिश्किल टिप्पणी करत कार्तिकने अश्विनचे आभार मानले असल्याचे बोलले जात आहे.
किंग कोहलीची शानदार नाबाद खेळीपाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताची देखील सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाच्या अवघ्या ३१ धावांवर ४ गडी बाद झाले होते. १८ चेंडूत विजयासाठी ४८ धावांची गरज असताना विराटने शानदार खेळी केली. अखेर हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला.