थँक यू रोहित... थँक यू टीम इंडिया; विजेत्यांचे चाहत्यांनी मानले आभार

या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव व्यक्त करताना चाहत्यांना शब्दही पुरेसे पडत नव्हते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 09:48 AM2024-07-05T09:48:57+5:302024-07-05T09:49:37+5:30

whatsapp join usJoin us
Thank you Rohit... Thank you Team India; Fans thanked the winners | थँक यू रोहित... थँक यू टीम इंडिया; विजेत्यांचे चाहत्यांनी मानले आभार

थँक यू रोहित... थँक यू टीम इंडिया; विजेत्यांचे चाहत्यांनी मानले आभार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोहित नाईक

मुंबई :  भारतात क्रिकेट हा खेळ नसून धर्म आहे, असे म्हटले जाते आणि याचीच प्रचीती गुरुवारी आली. चर्चगेट स्थानक आणि वानखेडे स्टेडियम क्रिकेटप्रेमींच्या प्रचंड गर्दीने फुलले होते. अनेकांनी आपल्या ऑफिसमधून हाफ डे घेत, तर काहींनी दांडी मारून वानखेडे स्टेडियम गाठले. इतकेच नाही, तर काही क्रिकेटवेड्यांनी शेकडो किमीचा प्रवास केला तो केवळ आपल्या विश्वविजेत्या संघाला प्रत्यक्षात पाहण्यासाठी. कोणत्याही सामन्याला लाभली नसेल, अशी अभूतपूर्व गर्दी गुरुवारी चर्चगेट परिसरात जमली होती. या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव व्यक्त करताना चाहत्यांना शब्दही पुरेसे पडत नव्हते.

टी-२० विश्वचषक जिंकण्याचा क्षण ऐतिहासिक होता. त्यावेळी स्टेडियममध्ये असायला हवे होते, असे वाटत होते. पण, ही कसर गुरुवारी भरून निघाली. वानखेडे स्टेडियमवर सर्वांना मोफत प्रवेश देण्याचा घेतलेला निर्णय खूप चांगला होता. यासाठी बीसीसीआय आणि एमसीएचे खूप खूप आभार. आम्हाला आमच्या विश्वविजेत्यांना जवळून पाहता आले. हा अनुभव विशेष होता. - कुशल गवाणकर, दहिसर

टीम इंडियाला जवळून पाहण्यासाठी मी पुण्यातून आलो. २०२३ च्या विश्वचषक पराभवानंतर आम्ही सगळे मित्र रडलो होतो. पण, आज आपल्या टीमने विजयोत्सवाची संधी दिली. माझ्या भावना खरंच आज सांगू शकत नाही. पावसातूनही आम्ही मित्र आमच्या विश्वविजेत्या टीमला पाहण्यासाठी मुंबईत आलोय. हा दिवस कधीच विसरणार नाही.- ऋषिकेश पाडे, पुणे

आज ठरवून वानखेडे स्टेडियम गाठलंय. शाळेत असताना २०११ साली विश्वचषक जिंकताना पाहिला होता. आज १३ वर्षांनी प्रत्यक्ष टीम इंडियाला थेट पाहण्याची संधी मिळाली. हा अनुभव खरंच व्यक्त करू शकत नाही. - किरण कदम, उरण

पहिल्यांदाच वानखेडे स्टेडियमवर आलो आणि हा अनुभव संस्मरणीय ठरला. भारतीय संघाला टी-२० विश्वचषक घेऊन व्हिक्टरी लॅप घेताना पाहायची संधी मला आज मिळाली आहे. एक क्रिकेटप्रेमी म्हणून स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो की मी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालो.- हर्षल हंभिर, पनवेल

मुंबईच्या राजाला (रोहित शर्मा) प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. तेही विश्वचषकासोबत. बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाला अशी ट्रॉफी घेऊन मिरवताना पाहिले नव्हते. पण, गुरुवारी टीम इंडियाने आम्हा क्रिकेटप्रेमींना सोन्याची संधी दिली. थँक्यू रोहित शर्मा आणि टीम इंडिया. मुंबई क्रिकेटनेही सर्व प्रेक्षकांना मोफत प्रवेश दिला, त्यांचेही आभार.- गौरव सावंत, बदलापूर.

मला कसंही करून भारतीय संघाची विजयी यात्रा पाहायची होती. तसेच, ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करायचा होता. त्यासाठी मी ऑफिसमधूनही लवकरच निघालो. लोकल ट्रेनमध्येही क्रिकेटचाहत्यांच्या गर्दीने वेगळेच वातावरण झाले होते. क्रिकट सामना नसतानाही सगळीकडे झालेले क्रिकेटमय वातावरण भन्नाट होते. वानखेडे स्टेडियमवरचा अनुभव अप्रतिम ठरला.- वैभव शिंदे, बोरिवली.

भारतीय संघाने जो पराक्रम केला तो अप्रतिम होता. या गौरवास्पद विजयाचा जल्लोष करण्याची आणि टीम इंडियाला सलाम करण्याची संधी गुरुवारी मिळाली. वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माला विश्वचषकासह पाहिल्यानंतर अंगावर काटा आला. भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडू आणि प्रशिक्षकाचा अभिमान आहे. वानखेडे स्टेडियमवरचा माहोल शानदार होता.- रवी प्रजापती, डोंबिवली

Web Title: Thank you Rohit... Thank you Team India; Fans thanked the winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.