- रोहित नाईकअहमदाबाद : ‘मुंबई क्रिकेट संघटना आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे खूप आभार मानायला हवेत. त्यांनी सर्व साखळी सामन्यांसाठी मोठी मेहनत घेतली आणि दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली’, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएलच्या १५ व्या सत्राच्या अंतिम सामन्याच्या तयारीवर शहा यांचे लक्ष आहे.
अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला शहा यांनी संवाद साधताना म्हटले की, ‘कोरोना काळात आयपीएल देशात आयोजित करणे मोठे आव्हान होते आणि यासाठी मुंबई व महाराष्ट्र संघटनेने चांगली कामगिरी केली. वानखेडे स्टेडियम, डी. वाय. पाटील स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम यांच्यासह महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनेही चांगला बंदोबस्त केला होता.’
शहा पुढे म्हणाले की, ‘आयपीएलमध्ये संपूर्ण भारतातील गुणवत्ता खेळत असते. त्यामुळे अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रकोप झाला असता, तर त्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागला असता. यामुळे बीसीसीआय, खेळाडू यांच्यासह पुरस्कर्ते आणि इतर घटकांनाही मोठा आर्थिक फटका बसला असता. आम्ही प्रवासावर निर्बंध आणून एकाच ठिकाणी साखळी सामने खेळविण्याचा निर्णय घेतला.’
आयपीएल अंतिम सामन्यासाठी आयसीसी अधिकाऱ्यांचे एक पथक अहमदाबाद येथे आले आहे. याविषयी शहा म्हणाले की, ‘बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलसाठी केलेली तयारी आणि बंदोबस्त पाहून आयसीसीचे अधिकारी प्रभावित झाले. नरेंद्र मोदी स्टेडियमची भव्यता तसेच येथील सोयी-सुविधाही त्यांना आवडल्या.’