PM Narendra Modi Call Team India : बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना जिंकला. यासह भारतीय संघाने १२ वर्षाच्या प्रदीघ काळानंतर आयसीसी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशाने जोरदार सेलीब्रेशन केलं. विजयानंतर देशात जल्लोषाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या विजयात सामील झाले असून त्यांनी फोनवरुन भारतीय संघाचे कौतुक करत आभार मानले आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शनिवारी टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रथमच विश्वचषक जिंकला आहे. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियामुळे हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नव्हतं. मात्र भारतीय खेळाडूंनी केलेल्या दमदार कामगिरीने टी-२० विश्वचषक जिंकला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. भारतीय संघाचा चॅम्पियन असा उल्लेख करत विश्वचषकासोबतच तुम्ही कोट्यावधी लोकांची मने जिंकली आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
विश्वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी फोन करून भारतीय संघाच्या खेळाडूंशी वैयक्तिक संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. उत्कृष्ट कर्णधारपदाच्या कामगिरीसाठी पंतप्रधानांनी रोहित शर्माचे अभिनंदन केले आणि त्याच्या टी-२० च्या कारकिर्दीची प्रशंसा केली. यासोबत पंतप्रधान मोदींनी रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या जोडीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विराट कोहलीला टी-२० मध्ये तुझी आठवण येईल. याशिवाय शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवच्या महत्त्वाच्या कॅचचेही कौतुक झाले.
"तुझं व्यक्तिमत्व उत्कृष्ट आहे. तुझी आक्रमक खेळी, फलंदाजी आणि कर्णधारपद यामुळे भारतीय संघाला नवी ओळख मिळाली आहे. तुझी टी-२०ची कारकीर्द कायम लक्षात राहील. आज तुझ्याशी आधी बोलून आनंद झाला”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहित शर्माला म्हणाले. "तुझ्याशी बोलून आनंद झाला. फायनलमधील डावांप्रमाणेच तुझी भारतीय फलंदाजी शानदारपणे आहे. तू खेळाच्या सर्व प्रकारांमध्ये चमकला आहेस. टी-२० क्रिकेटमध्ये तुझी कायम आठवण येईल. पण मला विश्वास आहे की तू नवीन पिढीच्या खेळाडूंना प्रेरित करत राहशील,” अशा शब्दात मोदींनी विराट कोहलीचे कौतुक केले.
दरम्यान, रोहित शर्माशी झालेल्या संभाषणात, पंतप्रधान मोदींनी हार्दिक पांड्या आणि बुमराहच्या तगड्या गोलंदाजीशिवाय शेवटच्या षटकात अतिशय कठीण झेल घेतल्याबद्दल सूर्यकुमार यादवचेही कौतुक केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सर्व भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
Web Title: Thanks to Rohit and Dravid PM Narendra Modi called Team India after winning T20 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.