मुंबई: टीम इंडियाच्या दोन विश्वचषक विजयात मोलाचं योगदान देणाऱ्या गौतम गंभीरनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. दिल्लीकर गौतम गंभीरनं निवृत्ती स्वीकारताच क्रिकेट रसिकांनी सोशल मीडियावर त्याला हळवा निरोप दिला. गौतमनं निवृत्ती जाहीर करताच सोशल मीडिया भावूक झाला. भारताला दोन विश्वचषक मिळवून देणाऱ्या गौतमला सोशल मीडियानं हळवा निरोप दिला आहे. गंभीरनं निवृत्तीची घोषणा करताच ट्विटरवर #ThankYouGambhir हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. पहिलवहिला टी20 विश्वचषक जिंकून देण्यात गौतम गंभीरच्या खंबीर खेळीचा मोठा वाटा होता. गौतमनं अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान तोफखान्याचा सामना करत 75 धावांची खेळी केली होती. एका बाजूनं फलंदाजी बाद होत असताना गंभीरनं एक बाजू लावून धरली आणि संघाला सन्मानजनक धावांचा टप्पा गाठून दिला. विशेष म्हणजे स्वत:ची विकेट सांभाळून धावगती वाढवण्याची दुहेरी जबाबदारी त्यानं या सामन्यात पार पाडली.2011 चा विश्वचषक जिंकून देण्यातही त्याचा सिंहाचा वाटा होता. वानखेडेवरील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गौतम गंभीरनं 97 धावांची खेळी साकारली. गंभीरच्या याच खेळीनं भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यामुळे श्रीलंकेनं दिलेलं 275 धावांचं लक्ष्य गाठत भारतानं विश्वचषक जिंकला. या दोन्ही सामन्यात प्रचंड दडपणाखाली गंभीरनं सुरेख फलंदाजी केली. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यात त्यानं भारताकडून सर्वोच्च धावा काढल्या. गौतम गंभीरनं 2004 मध्ये कसोटी पदार्पण केलं. त्यानं 58 कसोटी सामन्यांमध्ये 4,154 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याच्या नावावर 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5,238 धावा जमा आहेत. यात 11 शतकं आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय 37 सामन्यात त्यानं देशाचं प्रतिनिधीत्व केलं. यात त्यानं 932 धावा फटकावल्या.