गुवाहाटी - भारताचा घडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने फॉर्ममध्ये पुनरागमन केलं आहे. अफगाणिस्तानविरुद्धची शतकी खेळी, त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक लढतीत फटकावलेलं जिगरबाज अर्धशतक आणि आता काल रात्री दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद ४९ धावांची खेळी करत त्याने आपण टी-२० विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, कालच्या सामन्यात विराट कोहलीच्या हुकलेल्या अर्धशतकाचीच मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. शेवटच्या षटकात स्ट्राइक न घेतल्याने विराटचं अर्धशतक झालं नसल्याचं बोललं जातंय. मात्र शेवटच्या षटकामध्ये स्ट्राइक न मिळाल्याने नाही तर या खेळीदरम्यान विराटने केलेल्या एका चुकीमुळे त्याचं अर्धशतक हुकलं आहे.
दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये भारताची फलंदाजी सुरू असताना १४ व्या षटकात वेन पार्नेल गोलंदाजी करत होता. त्यावेळी विराट कोहलीने पाचव्या चेंडूवर जोरदार फटका मारला. त्यानंतर क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जाईपर्यंत विराटने वेगाने धावून दोन धावा घेतल्या. मात्र दुसरी धाव घेताना विराटकडून चूक झाली. त्याची बॅट लाईनला पूर्णपणे न लागल्याचे पंचांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी शॉर्ट रनचा इशारा केला. त्यामुळे विराटच्या धावसंख्येतून एक धाव कापण्यात आली. त्यामुळे विराटला दोन धावा धावूनही एका धावेवरच समाधान मानावे लागले. शेवटी विराट कोहली ४९ धावांवर नाबाद राहिला. जर ही धाव पूर्ण झाली असती तर त्याचे अर्धशतक पूर्ण झाले असते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली सुरुवातीला काहीसा चाचपडत होता. मात्र सूर्यकुमारची फटकेबाजी सुरू झाल्यानंतर विराट कोहलीलाही लय गवसली. त्यानंतर आक्रमक होत त्याने २८ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. त्यामध्ये त्याच्या ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या खेळीदरम्यान विराटने टी-२० क्रिकेटमध्ये ११ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.