नवी दिल्ली: 'भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार घोळत होता,' असा खळबळजनक दावा त्याचा मित्र उमेश कुमार याने केला आहे. शमीने मैदानात आणि मैदानाबाहेरही अनेक संकटांना तोंड दिले आहे.
वारंवार दुखापती, पत्नीशी वैयक्तिक कलह, आपल्या मुलीपासून दूर राहणे आणि सर्वांत त्रासदायक त्याच्यावर झालेले मॅच फिक्सिंगचे आरोप. पत्नीने त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती, त्यानंतरही बीसीसीआयने शमीसोबतचा करार कायम ठेवला होता. शमीच्या कारकिर्दीतील हा सर्वांत वाईट काळ ठरला. त्याच्या मनात आयुष्य संपवण्याचे विचार येत होते. शमीने त्याआधी आत्महत्या हा दुःख संपविण्याचा पर्याय असल्याचे म्हटले होते.
ती सर्वात मोठी रात्रउमेशने सांगितले की 'त्या' रात्री शमी काहीतरी कठोर निर्णय घेण्याच्या स्थितीत होता. त्याला आपले आयुष्य संपवायचे होते. मी पाणी प्यायला उठलो तेव्हा पहाटेचे ४ वाजले होते. तेव्हा शमी बाल्कनीत उभा असल्याचे दिसले. आम्ही ज्या मजल्यावर राहत होतो तो १९ वा मजला होता. काय झाले ते मला समजले. शमीच्या कारकिर्दीतील ती रात्र सर्वांत मोठी होती, असे मला वाटते. नंतर एके दिवशी आम्ही बोलत असताना त्याच्या फोनवर या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीकडून 'क्लीन चिट' मिळाल्याचा मेसेज आला.'शुभंकर मिश्राचा पॉडकास्ट 'अनप्लग्ड'मध्ये उमेश म्हणाला, 'शमी प्रत्येक गोष्टीशी झुंजत होता. तो माझ्यासोबत माझ्या घरी राहत होता; पण जेव्हा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फिक्सिंगचे आरोप झाले आणि त्या रात्री त्याची चौकशी झाली, तेव्हा तो हतबल झाला. मला म्हणाला, 'मी सर्व काही सहन करू शकतो; परंतु माझ्या देशाशी विश्वासघात केल्याचा आरोप सहन होत नाही.'