कोलकाता : भारताचा वन डे स्पेशालिस्ट खेळाडू अंबाती रायुडूने शनिवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या रायुडूच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. भारतीय संघाला चौथ्या क्रमांकासाठी भरवशाचा फलंदाज मिळाला, असे संकेत कर्णधार विराट कोहलीनेही दिले होते. 2019च्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघातील स्थान पक्के समजले जात आहे. याच कारणामुळे त्याने पाच दिवसीय क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग संघाकडून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत त्याच्याकडे चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पाहिले जात आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावून एकूण 217 धावा केल्या आहेत.