T20 World Cup 2024 - भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची सर्वांना उत्सुकता आहे, कारण या स्पर्धेत भारतीय संघात बरेच तरुण चेहरे पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर होणाऱ्या या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तारखा समोर आल्या आहेत आणि हाती आलेल्या वृत्तानुसार ४ ते ३० जून या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. अमेरिकेत प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे आणि फ्लोरिडा ( जिथे भारत-वेस्ट इंडिज यांच्यातली ट्वेंटी-२० लढत पुढील आठवड्यात होणार आहे), मॉरिसव्हिल, डल्लास व न्यू यॉर्क येथे स्पर्धेतील सामने व सराव सामने खेळवले जातील.
मॉरिसव्हिल आणि डल्लास येथे सध्या मेजर लीग क्रिकेटच्या लढती होत आहेत. पण, डल्लास, मॉरिसव्हिल आणि न्यू यॉर्क येथील स्टेडियम्सना अद्याप आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा दर्जा मिळालेला नाही. जो आयसीसी नियमानुसार गरजेचा आहे. आगामी काळात याबाबत निर्णय घेतला जाईल. या आठवड्यात आयर्लंड, स्कॉटलंड व पापुआ न्यू गिनी यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित केली आहे. पूर्व आशिया-पॅसिफिक विभागातून पापुआ न्यू गिनी आणि युरोप विभागातून आयर्लंड व स्कॉटलंड यांनी जागा पक्की केली आहे. आता अमरेकन्स ( १ जागा), आफ्रिका ( दोन जागा) आणि आशिया ( २ जागा) विभागातून संघ निश्चित व्हायचे आहेत.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, नेदरलँड्स, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज व अमेरिका यांनी आधीच स्पर्धेतील पात्रता निश्चित केली आहे. अफगाणिस्तान व बांगलादेश यांचे स्थान ट्वेंटी-२० रँकिंगवर अवलंबून आहे. मागील दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपेक्षा पुढील स्पर्धेचा फॉरमॅट वेगळा असणार आहे. पुढील वर्षी २० संघ खेळणार असल्याने प्रत्येकी ५ अशा चार गटांत संघांची विभागणी केली जाईल. सर्व गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ मध्ये खेळतील आणि त्यानंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरीत व नंतर अंतिम सामना होईल.