ICC Men's Rankings : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने आयसीसी वन डे क्रमवारीतील अव्वल स्थान गमावले आहे. भारताचा २४ वर्षीय फलंदाज शुबमन गिल ( Shubman Gill ) हा नवा किंग बनला आहे. आसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गिल चांगल्या फॉर्मात आहे आणि तेच दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार बाबर कामगिरीशी संघर्ष करताना दिसतोय. आयसीसी वन डे क्रमवारीत नंबर १ फलंदाज झालेला शुबमन हा चौथा भारतीय आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी अव्वल स्थान पटकावले होते.
भारताच्या युवा सलामीवीर शुबमनने श्रीलंकेविरुद्ध ९२ धावा केल्या होत्या आणि मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २३ धावांची खेळी केली होती. त्याने वर्ल्ड कपमध्ये सहा डावांमध्ये २१९ धावा केल्या आहेत. बाबरने ८ सामन्यांत २८२ धावा केल्या आहेत आणि त्याच्या रेटींग पॉईंट्मधील सहा गुण कमी झाले आहेत. बाबर ९५१ दिवस नंबर १ होता आणि गिलने त्याला मागे टाकले आहे. गिलसोबत भारताचा स्टार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आला आहे.
जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज याने पुन्हा एकदा नंबर १ स्थान काबीज केले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने १० विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी विभागात टॉप १० मध्ये बरीच उलथापालथ झालेली पाहायला मिळते. गिलने त्याच्या वन डेतील आताच सुरू झालेल्या कारकीर्दित मोठी झेप घेतली आहे. गिल ८३० रेटींग पॉईंट्ससह टॉपर झाला आहे, तर बाबर ( ८२४) व दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक ( ७७१) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विराट कोहली ७७० पॉईंटसह चौथ्या आणि रोहित शर्मा ७३९ पॉईंटसह पाचव्या क्रमांकावर आहेत.
क्विंटन डी कॉकने वर्ल्ड कपमध्ये ५४३ धावा केल्या आहेत. भारताचा श्रेयस अय्यर १७ स्थानांच्या सुधारणेसह १८व्या क्रमांकावर आला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान ( ११) आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झाद्रान ( १२) यांनीही अनुक्रमे ३ व ६ स्थानांची सुधारणा केली आहे. गोलंदाजांमध्ये सिराज ७०९ पॉईंटसह अव्वल स्थानी आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज ( ६९४), ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा ( ६६२), भारताचा कुलदीप यादव ( ६६१) आणि पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी ( ६५८) हे अव्वल पाचमध्ये आहेत. जसप्रीत बुमराह ३ स्थानांच्या सुधारणेसह ८व्या क्रमांकावर आणि मोहम्मद शमी ७ स्थानांच्या सुधारणेसह १०व्या क्रमांकावर आला आहे.