women premier league 2023 । नवी दिल्ली : पाकिस्तानीमहिला संघाची माजी कर्णधार आणि समालोचक उरूज मुमताजने महिला प्रीमियर लीगच्या (WPL) लिलावावर एक मोठे विधान केले आहे. पाकिस्तानी खेळाडूंना महिला प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या सत्रातून वगळणे दुर्दैवी असल्याचे तिने म्हटले आहे. महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. काल महिला प्रीमियर लीगसाठी मुंबईत लिलाव पार पडला. पाच फ्रँचायझींनी 87 खेळाडूंवर 59.50 कोटी रुपये खर्च करून पहिला WPL लिलाव संपवला. BCCI ने लिलावासाठी 409 खेळाडूंची निवड केली होती, ज्यात 270 भारतीयांचा समावेश होता.
स्मृती मानधनावर पैशांचा वर्षाव भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना महिला प्रीमियर लीगच्या (WPL) लिलावात सर्वाधिक मानधन घेणारी खेळाडू ठरली. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 3.40 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. तर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 1.80 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. याशिवाय मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या नॅट शीव्हर ब्रंटला 3.20 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले.
पाकिस्तानी खेळाडू नसणे हे दुर्दैवी आहे - मुमताज उरूज मुमताजने ESPNcricinfoशी बोलताना सांगितले की, महिला प्रीमियर लीगला पाकिस्तानी खेळाडूंना मुकावे लागले हे खूप दुर्दैवी आहे. प्रत्येक संधी न्याय्य आणि सर्वसमावेशक असायला हवी. तसेच सर्व संधी ही एकत्रितपणे महिलांच्या खेळाचा स्तर उंचावण्याच्या आणि जागतिक स्तरावर खेळाचा विकास करण्याच्या दिशेने पावले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशाने क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रांमधील दरी वाढत जाते. पाकिस्तानच्या कर्णधाराने व्यक्त केली नाराजी पाकिस्तानी संघाची विद्यमान कर्णधार बिस्माह मारूफ हिला महिला प्रीमियर लीगच्या लिलावाबाबत विचारण्यात आले असता तिनेही नाराजी व्यक्त केली. महिला ट्वेंटी-20 विश्वचषकात भारताकडून सलामीच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर ती म्हणाली, "पाकिस्तान म्हणून आम्हाला लीगमध्ये खेळण्याची फारशी संधी मिळत नाही आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. अर्थात आम्हाला खेळायला आवडेल आणि आम्हाला लीगमध्ये प्रत्येक संधी मिळवायची आहे. पण ते आपल्या नियंत्रणात नाही."
WPLच्या पहिल्या हंगामासाठी सर्व 5 संघ खालीलप्रमाणे - दिल्ली कॅपिलट्सचा - मेग लॅनिंग, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, लॉरा हॅरीस, जेसिया अख्तर, मॅरिझन्ने कॅप, शिखा पांडे, राधा यादव, मिन्नू मनी, तितास साधू, तारा नॉरिस, एलिसे कॅप्स, जेस जॉनासेन, स्नेह दीप्ती, अरुंधती रेड्डी, अपर्णा मोंडला, पूनम यादव, तानिया भाटीया
यूपी वॉरियर्स -दीप्ती शर्मा, एस यशश्री, सोफी एक्लेस्टन, लक्ष्मी यादव, ताहलिया मॅग्राथ, देविका वैद्य, शबनिम इस्मैल, ग्रेस हॅरीस, एलिसा हिली, लॉरेन बेल, अंजली सर्वणी, किरण नवगिरे, राजेश्वरी गायकवाड, सिमरन शेख, पार्श्नवी चोप्रा.
गुजरात जायंट्स - ॲश्ली गार्डनर, बेथ मुनी, दयालन हेमलथा, मानसी जोशी, ॲनाबेल सदरलँड, मोनिका पटेल, डिएंड्रा डॉटीन, सबिनेनी मेघना, सोफीया डंक्ली, सुष्मा वर्मा, हर्लीन देओल, हर्ली गाला, स्नेह राणा, अश्विनी कुमारी, जॉर्जिया वरेहम, परुणिका शिसोदिया, तनुजा कनवर, शबमन शकिल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -स्मृती मानधना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, रिचा घोष, एरिन बर्न्स, दीशा कसत, श्रेयंका पाटील, कनिका, ए शोबना, इंद्रानी रॉय, हिदर नाईट, डॅन व्हॅन निएकर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांझड, मीगन शुट, सहाना पवार.
मुंबई इंडियन्सचा संघ -हरमनप्रीत कौर, नॅट शिव्हर, एमिलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, जिंतिमणी कलित, नीलम बिष्ट.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"