ICC World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यांना आजपासून सुरूवात झाली आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्ध श्रीलंका मॅच खेळवली जातेय, तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. भारतीय संघ उद्या गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळेल. भारतीय संघ कालच गुवाहाटी येथे दाखल झाला आहे आणि वर्ल्ड कप संघात बदल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी भारताने १५ सदस्यीय संघात बदल केला. अक्षर पटेल याची दुखापतीमुळे वर्ल्ड कपची बस चुकली आणि त्याच्याजागी अनपेक्षितपणे आर अश्विनला संधी मिळाली. आता भारतीय संघात बदल होणार नाही. त्यामुळेच भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) थोडा निराश आहे, कारण त्याच्यामते एक खेळाडू संघात हवा होता.
भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १० वर्षांचा आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ संपवेल अशी अनेकांना आशा आहे. भारतीय संघाबाबत युवराज सिंग म्हणाला,''आपला संघ संतुलित आहे.... माझ्या मते युझवेंद्र चहल या संघात हवा होता, कारण आपण भारतात खेळतोय आणि येथे फिरकीला मदत मिळेल. पण, आपला संघ संतुलित आहे. ''
तो पुढे म्हणाला,''मी थोडा आश्चर्यचकित झालो, कारण मी म्हणालो की युझवेंद्र चहल हा एक लेग स्पिनर आहे जो तुम्हाला सामने जिंकून देतो आणि म्हणून एक चांगली निवड झाली असती. मला वाटले की वॉशिंग्टन सुंदर हा तरुण आहे आणि तो फलंदाजीही करू शकतो. पण शेवटी आजचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांना सर्वोत्तम फॉर्म पाहावा लागेल..."