भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये सुरू असलेला दुसरा कसोटी सामना आज दुसऱ्या दिवशीच संपण्याची चिन्हे दिसत आहेत. या सामन्यात पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या ५५ धावांत आटोपला. मोहम्मद सिराजने १५ धावांत आफ्रिकेच्या ६ फलंदाजांना बाद केले. मात्र त्यानंतर भारताचा डावही ४ बाद १५३ धावांवरून नाट्यमयरीत्या कोलमडत १५३ धावांवरच संपुष्टात आला. भारताला पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी मिळाली असली तरी खेळपट्टीचं रंगरूप पाहता दुसऱ्या डावात १२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणंही जड जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच दुसरा कसोटी सामना आजचं संपण्याची शक्यता आहे,.
दरम्यान, पहिल्या डावात ५५ धावांत गारद झालेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात पहिल्या दिवसअखेर ३ बाद ६२ धाव केल्या होत्या. त्यामुळे आता यजमान संघाने दुसऱ्या डावात समाधानकार धावसंख्या उभी करून भक्कम आव्हान देण्याच्या तयारीत असेल. दरम्यान, केपटाऊनमध्ये भारताने याआधी सहा कसोटी सामने खेळले आहेत. मात्र इथे भारतीय संघाला एकदाही विजय मिळालेला नाही. अशा परिस्थितीत भारताल शे-सव्वाशेच्या माफक आव्हानाचा पाठलागही जड जाणार का? या प्रश्नाचं उत्तर माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी दिले आहे.
संजय मांजरेकर म्हणाले की, केपटाऊन कसोटीची परिस्थिती पाहता भारताचे सहा फलंदाज झटपट बाद झाले तरी भारतीय संघाला विजय मिळवण्याची संधी आहे. यावेळी मोहम्मद सिराजच्या मेहनतीवर फलंदाजांनी पाणी फिरवलं का, असं विचारलं असता संजय मांजरेकर यांनी या गोष्टीशी असहमती दर्शवली. मात्र हा कसोटी सामना दोन दिवसांमध्येच समाप्त होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. चौथ्या डावात १२५ हून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग शक्य आहे का, असं विचारलं असता त्यांनी भारतीय संघ या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करेल, असंही त्यांनी सांगितलं.