खेळाडूंना वारंवार होणारी दुखापत अन् आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन BCCI अॅक्शन मोडमध्ये आली आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये फ्रँचायझींसोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ( NCA) काम करणार असल्याचे BCCI ने स्पष्ट केले आहे. जेणेकरून खेळाडूंच्या वर्कलोडवर लक्ष ठेवणे सोपे जाईल. पण, यावरून फ्रँचायझींमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. रविवारी BCCI ने एक आढावा बैठक घेतली आणि त्यात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या २० खेळाडूंची निवड करण्यात आली. या २० खेळाडूंवर लक्ष ठेवण्यासाठी NCA आयपीएल फ्रँयाचझींसोबत काम करणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट केले गेले.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया व इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड यांनीही आयपीएलमध्ये खेळणाऱ्या त्यांच्या खेळाडूंसोबत अशाच प्रकारे करार केलेला आहे. आता त्याच पावलावर BCCI पाऊल टाकणार आहे आणि प्रथमच बीसीआयने त्याबाबत अधिकृत जाहीर वक्तव्य केले आहे. त्यामुळे आयपीएल २०२३मध्ये सहभागी असलेल्या प्रमुख भारतीय खेळाडूंवर BCCI चे लक्ष असणार आहे. पण, BCCI ने जाहीर केलेल्या निवेदनात नेमकं काय हे स्पष्ट केलेले नाही.
इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही काही प्रतिक्रीया मिळालेली नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलिया व इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांना फ्रँचायझी नियमित स्वरूपात काही DATA देत असतात. यानुसार खेळाडूंनी नेट्समध्ये किंवा प्रत्यक्ष सामन्यात किती गोलंदाजी करावी, याबाबत काही मर्यादा आखलेल्या असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभाग घेण्यासाठी NOC घेणं बंधनकारक आहे.
असाच प्रकारचे नियम BCCI आणू पाहतेय का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण, काही फ्रँचायझींचा याला विरोध आहे. आयपीएल २०२० यूएईत खेळवण्यात आली होती आणि त्यावेळी अध्यक्ष सौरव गांगुलीने रोहितला हॅमस्ट्रींग दुखापत झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडले नव्हते. पण, रोहित सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळला होता.
इंडियन एक्स्प्रेसनेच दिलेल्या वृत्तानुसार फ्रँचायझींचा मात्र DATA देण्यास नकार आहे. यापूर्वीही काही मोठ्या फ्रँचायझींनी NCA ला खेळाडूचा DATA देण्यास नकार दिला होता. “बीसीसीआय फ्रँचायझींना कोणत्याही आयपीएल सामन्यासाठी खेळाडूला विश्रांती देण्यास सांगू शकत नाही. ते अर्थातच वर्कलोडचे निरीक्षण करू शकतात आणि कोणताही डेटा सामायिक करण्यासाठी विचारू शकतात, परंतु ते कॅप निश्चित करू शकत नाहीत आणि असे म्हणू शकतात की एखादा विशिष्ट खेळाडू फक्त X क्रमांकाचे सामने खेळू शकतो किंवा फक्त X क्रमांकाची षटके टाकू शकतो," असे फ्रँचायझी अधिकाऱ्याने सांगितले.
महत्त्वाच्या शिफारशी कागदावर भक्कम दिसत असल्या तरी, बीसीसीआय फ्रँचायझींना कितपत पुढे ढकलण्यात सक्षम असेल हे काळच सांगेल. तांत्रिकदृष्ट्या, टूर्नामेंट विंडोदरम्यान, खेळाडू BCCI सोबत नसून फ्रँचायझींशी करारात असतात आणि CA आणि ECB प्रमाणेच, ही वास्तविकता BCCI ला वर्कलोड मॅनेजमेंटच्या संदर्भात कोणतेही आदेश देण्यास मनाई करेल. त्यामुळे हा कार्यक्रम राबवायचा असेल तर बीसीसीआयला काही वेगळा मार्ग भारतीय क्रिकेटच्या हितासाठी निवडावा लागेल यात शंका नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"