Women's Premier League 2024 - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ यंदा २२ मार्चपासून सुरू होणार असल्याची चर्चा आहे. १ जूनपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू होणार असल्याने बीसीसीआयला खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी आयपीएल लवकर उरकणे भाग आहे. यातच महिला प्रीमिअर लीग २०२४ केव्हा होईल याचीही सर्वांना उत्सुकता आहे. WPL चे मागील पर्व मुंबईत खेळवण्यात आले होते, परंतु यावेळी ही लीग मुंबईबाहेर होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. बीसीसीआयने त्यासाठी बंगळुरू आणि दिल्ली या दोन शहरांची नावं शॉर्ट लिस्ट केली आहेत. २२ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२४ या कालावधीत WPL 2024 पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार महिला प्रीमिअऱ लीगचा पहिला टप्पा बंगळुरू येथे खेळवण्यात येईल, तर दुसऱ्या टप्प्यातील सामना दिल्लीत होतील. यामध्ये बाद फेरीच्या लढतींचाही समावेश आहे. पाच संघांचा समावेश असलेल्या या लीगमध्ये २२ सामने होतील. पहिली WPL मुंबई व नवी मुंबईत खेळवण्यात आली होती. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी WPL चे दुसरे पर्व एकाच राज्यात खेळवण्याची BCCI ची इच्छा असल्याचे सांगितले होते. पण, बीसीसीआयने दोन शहरांची निवड केली. पण, बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम आणि दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सलग १० सामने खेळवणे आव्हानात्मक असणार आहे. WPL च्या मागच्या पर्वात मुंबई इंडियन्सने फआयनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर मात करून जेतेपद पटकावले होते.
WPL Auction 2024 मधील पाच महागड्या खेळाडू
- काशवी गौतम (भारत) २ कोटी - भारताची अनकॅप्ड खेळाडू काशवी गौतमसाठी गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चुरस झाली. यानंतर आरसीबीने अखेर माघार घेतली अन् काशवी गुजरातच्या ताफ्यात गेली. तिची मूळ किंमत १० लाख रुपये होती आणि तिला गुजरात जायंट्सने २ कोटी रुपयांना विकत घेतले, जी सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे.
- ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया) २ कोटी - ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चांगलीच चढाओढ झाल्याचे पाहायला मिळाले. अष्टपैलू ॲनाबेल सदरलँडची मूळ किंमत ४० लाख रूपये होती, जिला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांत खरेदी केली.
- वृंदा दिनेश (भारत) १.३० कोटी - भारताची अनकॅप्ड खेळाडू वृंदा दिनेश हिने सर्वांना चकित केले. तिची मूळ किंमत १० लाख रुपये होती. पण, तिला यूपी वॉरियर्सने १.३० कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले.
- शबनीम इस्माइल (दक्षिण आफ्रिका) १.२० कोटी - मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर कुरघोडी करून १.२० कोटी रूपयांत शबनीमला आपल्या संघाचा भाग बनवले. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल, जिची मूळ किंमत ४० लाख रुपये होती.
- फोबी लिचफील्ड (ऑस्ट्रेलिया) १ कोटी - गुजरातच्या फ्रँचायझीने सर्वाधिक पैसे असल्याचा फायदा घेत स्टार खेळाडूला १ कोटींच्या किंमतीत आपल्या ताफ्यात घेतले.