BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे... इथे खेळाडूंना ७-७ कोटी वर्षाला पगार दिला जातो, त्याशिवाय मॅच फी मधून होणारी बक्कळ कमाई वेगळी. पण, निवृत्तीनंतर खेळाडू टीम इंडियाच्या निवड समितीत किंवा मुख्य प्रशिक्षक पदासाठी फारसा रस दाखवत नसल्याचे वारंवार दिसले आहे. भारतीय क्रिकेटमधील मोठी नावं अनेकदा राष्ट्रीय निवड समितीच्या पदासाठी अर्ज करण्यास टाळाटाळ करतात. कमी पगार हे त्याचे कारण आहे. पगार वाढ करत नाहीत, तोपर्यंत चेतन शर्मा यांच्या जागी BCCIला नवे निवड समिती अध्यक्ष मिळणार नाही. फेब्रुवारीमध्ये स्टिंग ऑपरेशननंतर शर्मा यांना त्यांचे पद गमवावे लागले.
भारताचे माजी सलामीवीर शिवसुंदर दास यांची शर्मा यांच्या जागी अध्यक्षपदी नियुक्ती केली गेलीय, तर एस शरथ (दक्षिण), सुब्रतो बॅनर्जी (मध्य) आणि सलील अंकोला (पश्चिम) यांची निवड समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षांना वर्षाला १ कोटी रुपये, तर इतर चार सदस्यांना ९० लाख रुपये मिळतात. दिलीप वेंगसरकर ( २००६ ते २००८) आणि कृष्णमाचारी श्रीकांत ( २००८ ते २०१२) हे ज्येष्ठ क्रिकेटपटू निवड समितीचे अध्यक्ष होते. श्रीकांत निवड समिती अध्यक्ष झाल्यानंतर बीसीसीआयने पगार देण्यास सुरुवात केली, पण वेंगसरकर यांनी बिनपगारी काम केले होते.
दिग्गज खेळाडू एकतर ब्रॉडकास्ट चॅनेल किंवा आयपीएल संघांशी संबंधित आहेत. काहींच्या अकादमी आहेत, तर काही कॉलम लिहितात. गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि युवराज सिंग हे देखील उत्तर विभागातील आहेत, पण क्रिकेटला अलविदा केल्यानंतरचा पाच वर्ष पूर्ण करण्याचा निकष ते पूर्ण करत नाहीत. भारताचा माजी फिरकीपटू मनिंदर सिंगने दोनदा अर्ज केला होता, परंतु पहिल्यांदा मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते, पण दुसऱ्यांदा नाही.
''क्रिकेट सुधारक समिती असताना वीरेंद्र सेहवागला मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितले होते आणि त्यानंतर अनिल कुंबळे यांना विचारणा करण्यात आली. आता वीरू पुन्हा अर्ज करण्याची शक्यता कमीच आहे, कारण मिळणारं मानधन हे त्याच्या स्टेटसला शोभेसं नाही. निवड समिती अध्यक्षांनाही बीसीसीआय ४-५ कोटी देत नाहीत. बीसीसीआयने त्यांच्याही पगारात वाढ केली, तर दिग्गज खेळाडू अर्ज करतील, असे वाटते,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने PTIला सांगितले.