भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) त्यांचा पूर्वीचा निर्णय बदलताना भारताच्या पुरुष व महिला संघ आशियाई स्पर्धेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. Asian Games 2023मध्ये ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळवलं जाणार आहे आणि २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा चीनमध्ये पार पडणार आहे. याच कालावधीत भारतात वन डे वर्ल्ड कप होणार असल्याने आशियाई स्पर्धेत भारतीय पुरूष संघाची बी टीम पाठवणार असल्याचे समोर येतंय. ५ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत भारतात वन डे वर्ल्ड कप होणार आहे. बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत घोषणा होणं तेवढं शिल्लक आहे.
बीसीसीआय ३० जूनच्या आत भारतीय ऑलिम्पिक समितीकडे पुरुष व महिला संघाची अंतिम यादी पाठवणार असल्याचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. यापूर्वी २०१० व २०१४च्या आशियाई स्पर्धेत क्रिकेट खेळलं गेलं, परंतु बीसीसीआयने संघ पाठवणे गरजेचे नाही समजलं. आशियाई स्पर्धा मागच्या वर्षीच होणार होती, परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलली गेली. जकार्ता येथे २०१८ साली पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत क्रिकेट बाद करण्यात आले होते. आतापर्यंत दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला असताना पुरुषांमध्ये एकदा श्रीलंका आणि एकदा बांगलादेशने सुवर्णपदक जिंकले आहे. दुसरीकडे, महिलांमध्ये पाकिस्तानने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे.
भारतीय क्रिकेट संघ याआधी १९९८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत शेवटच्या वेळी खेळला होता. त्यानंतर भारतीय पुरुष संघ क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळला. त्याच वेळी, दोन भारतीय पुरुष संघ एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी खेळण्याची ही तिसरी वेळ असेल. १९९८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेशिवाय भारताचा एक संघ सहारा कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळत होता. २०२१ मध्ये जेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडकडून कसोटी मालिका खेळत होता, तेव्हा दुसरा संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर वन डे- ट्वेंटी-२० मालिका खेळत होता.