न्यूयॉर्क : टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान लढत ही अमेरिकेतील क्रिकेटच्या महाकुंभात सर्वांत कडवी खुन्नस ठरणार असून ९ जून रोजी यशस्वीपणे दडपण झुगारून लावणारा संघच बाजी मारेल,’असे पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने म्हटले. याआधीच्या टी-२० विश्वचषकात विराट कोहलीने शानदार फलंदाजी करीत भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला होता. यंदा दोन्ही संघ पहिल्यांदाच अमेरिकेत भिडणार आहेत. आफ्रिदी स्वत: हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असणार आहे.
टी-२० विश्वचषकाचा दूत असलेला आफ्रिदीने आयसीसीद्वारे सांगितले की, ‘अमेरिकेत भारत - पाक लढतीचे महत्त्व ‘सुपर बाउल’सारखेच आहे. मला स्वत:ला भारताविरुद्ध खेळणे आवडायचे. माझ्या मते खेळातील सर्वांत मोठी कडवी स्पर्धा हीच आहे. मी भारताविरुद्ध खेळत असताना प्रतिस्पर्धी चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले, शिवाय सन्मानही लाभला.
दोन्ही संघांतील खेळाडूंना पुढे जाण्यासाठी या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. भारताविरुद्ध खेळताना असलेल्या दडपणावर तुम्ही कसा तोडगा शोधता यावर तुमचे यश अवलंबून असते. दोन्ही संघांना वर्षानुवर्षे या क्षणाची उत्कंठा असते. त्या दिवशी उभय संघ एकजुटीने झुंजतात. संपूर्ण स्पर्धेत हाच सामना लक्षवेधी असेल. यात जो संघ संयम पाळेल तो जिंकेल.’