निळा समुद्र अवतरला! पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांसाठी मर्यादेतच व्हिसा...

स्टेडियमकडे जाणारे सर्वच रस्ते निळ्या रंगात न्हाऊन निघालेले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास सर्व दरवाजांतून चाहत्यांची प्रवेशासाठी लगबग दिसली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 05:44 AM2023-10-15T05:44:21+5:302023-10-15T05:44:45+5:30

whatsapp join usJoin us
The blue sea has descended! Limited visa for Pakistani cricket fans... India vs Pakistan Match Crowd | निळा समुद्र अवतरला! पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांसाठी मर्यादेतच व्हिसा...

निळा समुद्र अवतरला! पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांसाठी मर्यादेतच व्हिसा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद :  भारत-पाकिस्तान सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर निळा समुद्र अवतरला. मैदानात जवळपास १ लाख ३२ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली. केवळ स्टेडियम नव्हे, तर संपूर्ण शहर चाहत्यांच्या निळ्या जर्सीच्या रंगात रंगून गेले. स्टेडियमकडे जाणारे सर्वच रस्ते निळ्या रंगात न्हाऊन निघालेले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास सर्व दरवाजांतून चाहत्यांची प्रवेशासाठी लगबग दिसली. भारताबाहेरून बँकॉक आणि सिंगापूरचे चाहते आले होते. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना मर्यादित व्हिसा मिळाला असल्याने त्यांची उपस्थिती नगण्य होती. स्थानिक लोकांच्या तुलनेत अन्य शहरांतील लोकांची संख्या अधिक होती. 

२ हजारांचे तिकीट ८ हजारांत!
बेंगळुरूहून आलेले डॉ. दीपक यांनी हॉटेलमधील खोल्यांसाठी मोठी रक्कम मोजली. त्यानंतर २ हजार किमतीचे तिकीट ८ हजारांत घेतले. त्यांना तीन तिकिटांसाठी २५ हजार मोजावे लागले. दुसरीकडे सुरतच्या तीन युवकांना राजकीय नेत्याच्या ओळखीने मोफत तिकीट उपलब्ध झाले. हॉटेल आणि रेस्टॉरंटचे दर गगनाला भिडले. तसेच तिकिटांचा काळाबाजार करून अनेकांनी हात धुतल्याची सर्वत्र चर्चा आहे.

सचिनचे आगमन होताच...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी कालच येथे दाखल झाला होता. ‘बीसीसीआय’ने गोल्डन तिकीट देत त्याला आमंत्रित करण्यात केले. सचिनचे आज विश्वचषक ट्रॉफीसह मैदानात आगमन होताच टाळ्या, शिट्ट्या आणि सचिन, सचिन... अशा घोषणांनी स्टेडियम दणाणून गेले. अहमदाबाद शहर नवरात्रोत्सव आणि धमाल दांडियासाठी प्रसिद्ध आहे. रविवारी नवरात्र सुरू होणार; पण त्याआधीच शहराला क्रिकेट महामुकाबल्यामुळे नववधूसारखे सजविण्यात आले आहे.

बनावट जर्सी २०० रुपयांत
टीम इंडियाची ओरिजिनल जर्सी स्टेडियममधील स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे; पण किंमत मात्र ४ ते ५ हजार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी जर्सी खरेदी करणे शक्य नसल्याने २०० ते १००० रुपयांत रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांकडून बनावट जर्सी खरेदी करण्यास अनेकांनी पसंती दिली.

पाकमधून आले ५ पत्रकार
या सामन्याच्या वृत्तांकनासाठी पाकिस्तानचे ५ पत्रकार येथे आले. यापैकी एका पत्रकाराने सांगितले की, आम्ही वाघा-अटारी सीमेवरून भारतात दाखल झालो. नंतर अमृतसर ते अहमदाबाद असा विमान प्रवास केला. पाकचे सामने असलेल्या शहरांचाच व्हिसा आम्हाला देण्यात आला आहे.

नवरात्रोत्सवात देशभक्तीला उधाण
शनिवारी दुपारचे तापमान होते ३५ अंश सेल्सिअस! प्रचंड उकाड्यात देशभक्ती आणि उत्साह ओसंडून वाहत होता. सामना सुरू होण्याआधी शंकर महादेवन, सुनिधी चौहान, अरिजितसिंग यांच्या ‘वंदे मातरम’ने उपस्थितांमध्ये जोश भरला. भव्य ‘मोटेरा’वर महादेवन यांनी ‘सुनो गौर से दुनियावालों’ गायला सुरुवात करताच स्टेडियममधील प्रत्येकजण त्यांच्या सुरात सूर मिसळून गाणे म्हणताना दिसला.

Web Title: The blue sea has descended! Limited visa for Pakistani cricket fans... India vs Pakistan Match Crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.