टाउन्सविले: ऑस्ट्रेलियन संघ ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरूद्ध तीन-तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी कांगारूचा संघ जाहीर करण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवडकर्त्यांनी घरच्या मैदानावर होणाऱ्या या एकदिवसीय मालिकेसाठी आगामी विश्वचषकाचा विचार करून संघ निवडला आहे. आरोन फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघ मैदानात असेल.
पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची पात्रता पाहता ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. याचा विचार करूनच ऑस्ट्रेलियाच्या संघाची निवड करण्यात आली असून त्यामध्ये डेविड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क या खेळाडूंचा समावेश करण्यात आाल आहे. विशेष म्हणजे टी-२० विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे असणार आहे.
२८ ऑगस्टपासून रंगणार थरार
ऑस्ट्रेलियाच्या संघाला ऑगस्टमध्ये झिम्बाब्वे आणि सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडविरूद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. झिम्बाब्वेच्या संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २८ ऑगस्टपासून सुरू होईल, जो ३ सप्टेंबरपर्यंत चालू असेल ज्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. हे तिन्ही सामने टाऊन्सविले येथे तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.४० वाजता सुरू होतील.
दरम्यान, न्यूझीलंडचा संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे पहिला सामना ६ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. तर मालिकेतील दुसरा सामना ८ सप्टेंबर आणि तिसरा सामना ११ सप्टेंबरला होईल. या दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिका केर्न्स येथे होणार आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील तिन्ही सामने दुपारी २.२० वाजता सुरू होतील.
झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
आरोन फिंच (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशाने, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड, सीन अबॉट, एश्टन एगर, ॲलेक्स कॅरीस कॅमरॉन ग्रीन, मिचेल मार्श, मार्कस स्टॉयनिस आणि ॲडम झॅम्पा,