मुंबई : नेतृत्वकर्ता अपयशी ठरला तर त्याने दोष कुणाला द्यावा. सहकाऱ्यांकडून अपेक्षा बाळगणाऱ्या कर्णधाराने इतरांना मार्ग दाखविणे अपेक्षित असते. यंदा आयपीएलमध्ये कर्णधारच व्हिलन ठरले आहेत. ते केवळ नावापुरते ‘स्टार’ ठरले. कर्णधाराची कामगिरी खराब झाली तर ती स्वत:पुरती मर्यादित राहत नाही. संघावरदेखील मोठा परिणाम होतो.
आयपीएल आता अखेरच्या टप्प्यात आले. अनेक दिग्गज आणि स्टार खेळाडू आहेत; पण आतापर्यंत हे खेळाडू चमकले नाहीत. यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, पंजाब किंग्जचा मयांक अग्रवाल, चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्रसिंग धोनी, सनरायझर्स हैदराबादचा केन विल्यमसन यांचा समावेश आहे. या सर्वांची कामगिरी लौकिकापेक्षा कमकुवत झाली. सर्वांची मिळून १८-१९ अशी सरासरी आहे.
केन विल्यमसन (सनरायझर्स हैदराबाद)
१२ सामने, २०८ धावा, सर्वोत्तम ५७, सरासरी १८.९०, स्ट्राईक रेट ९२.८५ - हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. कर्णधार केनला धावा करता आल्या नाहीत. १२ सामन्यात त्याने फक्त २०८ धावा केल्या आहेत.
मयांक अग्रवाल (पंजाब किंग्ज)
१२ सामने, १९५ धावा, सर्वोत्तम ५२, सरासरी- १७.७२, स्ट्राईक रेट १२५.०० - राहुलच्या जागी पंजाब किंग्जची सूत्रे सांभाळणाऱ्या मयांकसाठी हे सत्र अतिशय खराब ठरले. त्याला फक्त १९५ धावा करता आल्या आणि त्याची सरासरी १७.७२ इतकी आहे.
महेंद्रसिंह धोनी (चेन्नई सुपरकिंग्ज)
१३ सामने, २०६ धावा, सर्वोत्तम नाबाद ५०, सरासरी ३४.३३, स्ट्राईक रेट १२८.७५ - या सत्राच्या अर्ध्यातच जडेजाकडून धोनीकडे नेतृत्व आले. पण त्याने सर्व सामने खेळले आहेत. धोनीला १३ सामन्यात फक्त २०६ धावा करता आल्या. एक-दोन सामन्यात त्याने ठसा उमटविला आहे.
रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)
१२ सामने, २१८ धावा, सर्वोत्तम ४३, सरासरी १८.१६, स्ट्राईक रेट १२५.२८ - पाच वेळा चॅम्पियन असलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सलग आठ सामन्यात पराभव झाला. मुंबईच्या पराभवाचे आणखी एक कारण स्वत: रोहित फ्लॉप ठरला.