नवी दिल्ली : विश्वचषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध मिळालेल्या निराशाजनक पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम टीकेचा धनी ठरत आहे. पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली. माजी क्रिकेटपटू मोइन खान यानेही आझमला टार्गेट करताना, ‘बाबर डरपोक कर्णधार आहे,’ असे म्हटले.
१४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे झालेला भारत-पाक सामना अपेक्षेप्रमाणे चुरशीचा झाला नाही. एकतर्फी झालेल्या या सामन्यात यजमान भारताने सहज विजय मिळविला. यासह विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताने पाकला सलग आठव्यांदा नमविले. या सामन्यातील दारुण पराभवानंतर बाबरच्या कर्णधारपदावरही प्रश्न निर्माण होत आहेत.
मोइन खान याने म्हटले की, ‘बाबरने ५८ चेंडूंत ५० धावा केल्या. त्याच्या खेळीमध्ये आत्मविश्वास नव्हता. तो या सामन्यात घाबरलेला दिसला. जर कर्णधारच घाबरलेला दिसत असेल आणि खेळणार नसेल, तर संघातील इतर खेळाडूंकडून कोणती अपेक्षा करायची.’ पाकिस्तानला ४२.५ षटकांत १९१ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने दमदार फलंदाजी करताना ३०.३ षटकांमध्येच केवळ ३ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार केले.