लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या चार-पाच वर्षांमध्ये अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. जेव्हा एखादा प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नसतो, तेव्हा अन्य खेळाडूंना खेळवून काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जातो. चौथ्या स्थानावरील फलंदाजीविषयी मला हेच सांगायचे आहे, असे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने म्हटले.
मुंबईत गुरुवारी झालेल्या स्पॅनिश फुटबॉल ‘ला लिगा’च्या कार्यक्रमासाठी रोहित उपस्थित होता. भारतीय संघाला अजूनही चौथ्या क्रमांकावर भक्कमपणे खेळणाऱ्या फलंदाजाचा शोध असल्याचे सांगितले. याआधी, २०१९च्या विश्वचषक स्पर्धेसाठीही भारतीय संघाला याच स्थानावरील फलंदाजाची समस्या भेडसावत होती. श्रेयस अय्यरने दुखापतग्रस्त होण्याआधी चौथ्या स्थानावर फलंदाजी करताना २० सामन्यांत ८०५ धावा काढताना दोन शतके आणि पाच अर्धशतके झळकावली होती. रोहितने म्हटले की, 'चौथ्या क्रमांकाचे स्थान गेल्या अनेक काळापासून समस्या बनली आहे. युवराज सिंगने निवृत्ती घेतल्यानंतर कोणताही फलंदाज हे स्थान पक्के करू शकलेला नाही. गेल्या काही काळापासून श्रेयस या स्थानावर चांगली फलंदाजी करत होता. त्याचा रेकॉर्डही शानदार आहे. मात्र, दुर्दैवाने तो दुखापतग्रस्त झाला. यामुळे तो संघाबाहेर असून प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास गेली चार-पाच वर्षे हेच घडत आहे. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आणि नव्या फलंदाजांना त्यांच्या जागी खेळावे लागले. विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धेसाठी संघ कसा संतुलित राहील, यावर भर दिला जाईल. कर्णधार म्हणून माझी इच्छा आहे की, आगामी आशिया चषक स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी चांगल्या संघाविरुद्ध दबावामध्ये चांगली कामगिरी करावी.’
संघात कोणाचीही जागा निश्चित नसल्याचेही रोहितने सांगितले. तो म्हणाला की, ‘पुढील काही दिवसांमध्ये निवड समितीची बैठक होणार आहे आणि त्यात रणनीतीवर चांगली चर्चा होईल. पण, प्रामाणिकपणे सांगायचे तर संघात कोणाचेही स्थान निश्चित नाही. भले तो खेळाडू आघाडीच्या फळीतील असो की तळाच्या. आमच्याकडे अनेक नावे आहेत.
Web Title: The challenge of solving the fourth largest problem in one day; Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.