Join us  

विश्वविजेत्यांच्या जयघोषाने दुमदुमली क्रिकेटची पंढरी...; चाहत्यांच्या गर्दीने रस्ते फुलले

मुंबईत टीम इंडियाचे अभूतपूर्व स्वागत, दुपारनंतर लोकल गाड्या दुथडी भरून वाहत होत्या. गर्दीत महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग अधिक होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 9:53 AM

Open in App

मुंबई - विठूरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरीच्या दिशेने जात असतानाच गुरुवारी क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हजारो क्रिकेट भक्तांच्या दिंड्या येऊन थडकत होत्या. निमित्त होते अर्थातच विश्वविजेत्या क्रिकेटदेवांच्या दर्शनाचे... विश्वविजेत्यांना याचि देही, याचि डोळा पाहण्याची धडपड आणि उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. मुंबईत पावसातही चाहत्यांचा जल्लोष कमी झालेला नव्हता. 

वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस या बेटावर टी-२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत आयसीसी जेतेपदाचा ११ वर्षांचा दुष्काळ संपवणारा भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला. राजधानी नवी दिल्लीत संघाचे जल्लोषात स्वागत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संघासाठी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर दुपारी सर्व खेळाडू मुंबईकडे रवाना झाले. 

रोहितच्या निमंत्रणाला मान...विश्वकपाचे स्वागत करण्यासाठी समस्त भारतीयांनी आवर्जून यावे, या कर्णधार रोहित शर्माच्या आग्रहाच्या निमंत्रणाला मान देऊन मुंबईकर चाहत्यांनी दुपारपासूनच वानखेडे परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. कर्जत, कसारा, कल्याण, विरार, पालघर, नवी मुंबई, पनवेल, रायगड येथून क्रिकेट रसिकांचे जत्थे उत्साहाने वानखेडे स्टेडियमकडे येत होते. दुपारनंतर लोकल गाड्या दुथडी भरून वाहत होत्या. गर्दीत महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग अधिक होता. 

हार्दिक पांड्याची मागितली माफीआयपीएल सामन्यांदरम्यान वानखेडे स्टेडियमवर मुंबईकर चाहत्यांनी हार्दिक पांड्याची यथेच्छ हुर्यो उडवली होती. मात्र, विश्वचषक स्पर्धेतील त्याचे अखेरचे षटक निर्णायक ठरल्यानंतर तसेच संपूर्ण स्पर्धेत त्याने केलेल्या चमकदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांनी हार्दिकची मनापासून माफी मागितली. डेव्हिड मिलरचा सीमारेषेवर अफलातून झेल पकडणाऱ्या सूर्यकुमार यादवचाही जयघोष चाहते करत होते. जब तक सूरज चांद रहेगा सूर्या तेरा नाम रहेगा, या घोषणांनी चाहत्यांनी सूर्यावर स्तुतिसुमने उधळली. 

भर पावसात जल्लोषमुंबईत गुरुवारी दिवसभर उकाड्याचे वातावरण होते. मात्र, दुपारी चारनंतर मुंबईच्या आकाशात अचानक काळ्या ढगांनी दाटी केली आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. भारतीय संघाच्या स्वागतासाठी वरुणराजानेही वानखेडेवर उपस्थिती लावली होती. भर पावसातही चाहत्यांचा उत्साह यत्किंचितही कमी झाला नव्हता. आपल्या क्रिकेटदेवांच्या दर्शनसाठी सर्व भक्त स्टेडियमवर गर्दी करून होते.

मिरवणुकीचीच बस अडकलीट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची विजयी मिरवणूक मुंबईत निघणार होती. यासाठी मरिन ड्राइव्हवर चाहत्यांनी तुफान गर्दी केली केली; मात्र, इतकी गर्दी झाली की टीम इंडियाची ज्या ओपन बसमधून मिरवणूक निघणार आहे तीच बस गर्दीत अडकली होती.

ॲम्ब्युलन्सला करून दिली वाटटीम इंडियाच्या स्वागतासाठी मरिन ड्राइव्हवर चाहत्यांनी तुफान गर्दी केली असताना या गर्दीत एक ॲम्ब्युलन्स आली आणि चाहत्यांनी भान राखत त्वरित वाट मोकळी करुन दिली. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यासंदर्भातील व्हिडीओ शेअर करत सायरन बजता गया और रस्ता बनता गया, म्हणत मुंबईकरांना सलाम केला.

 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघमुंबईट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्मा