आभिलाष खांडेकर
इंदूर : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील तिसरा सामना धर्मशाला येथूल इंदूरला हलविण्याचा निर्णय बीसीसीआयने सोमवारी घेतला. इंदूरच्या क्रिकेट वर्तुळात या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. १ मार्चपासून तिसरी कसोटी होळकर स्टेडियमवर खेळली जाईल. त्यासाठी दोन्ही संघांचे २५ फेब्रुवारीला इंदूरमध्ये आगमन होईल.
इंदूरमध्ये झालेल्या प्रत्येक सामन्याचे साक्षीदार राहिलेले सुधीर सोनी म्हणाले, ‘इंदूरमध्ये कसोटी खेळली जाणार हे ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. २५ जानेवारी रोजी येथे भारत-न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामना खेळविण्यात आला होता. पुन्हा एक मेजवानी मिळाली.’ भारतीय आणि विदेशी खेळाडूंसाठी इंदूर हे आवडते स्थळ बनले आहे. अन्य स्टेडियम्सच्या तुलनेत होळकर मैदानाची प्रेक्षक क्षमता कमी असली तरी सामना कुठल्याही प्रकारात असो, भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर गर्दी उसळते.’ मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या मैदानावर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० सामना खेळला गेला. आता जानेवारीत वन डे लढत झाली.
इंदूरला कसोटी आयोजनास प्राधान्य देण्यामागे अनेक कारणे असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात एमपीसीएचे अध्यक्ष अभिलाष खांडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की,‘ बीसीसीआयने इंदूरला कसोटीचे यजमानपद दिले हे ऐकूण मनी फार आनंदी झालो. ऐनवेळी सामन्याचे यजमानपद भूषविण्याची क्षमता ओळखून बीसीसीआयने पुन्हा एकदा आम्हाला संधी दिली. स्थानिक प्रशासन आणि अन्य संबंधितांची येथे ताबडतोब मदत मिळत असल्याने कामे थांबत नाहीत.’
‘आम्ही येथे नुकतेच रणजी करंडक उपांत्य सामन्याचे आयोजन केले. त्यामुळे मैदान उत्तम स्थितीत असून पुढील दहा दिवसांत मैदानाच्या सौंदर्यात आणखी भर घातली जाईल,’ असे सांगून खांडेकर यांनी बीसीसीआयचे आभार मानले आहेत.